ठाण्यात मोबाईल दुकानात ‘छप्पर फाड के’ चोरी!

ठाण्यात मोबाईल दुकानात ‘छप्पर फाड के’ चोरी!

प्रातिनिधिक छायाचित्र

कोरोनामुळे लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे सगळी मंडळी घरात बसलेली असताना त्यांच्या व्यवसाय, दुकान किंवा गाळ्यांची सुरक्षा वाऱ्यावर आहे की काय? असाच प्रश्न आता निर्माण झाला आहे. कारण ही सगळी व्यावसायिक मंडळी घरात बसलेली असताना त्यांच्या दुकानांमध्ये चोऱ्या होण्याचं प्रमाण आता वाढू लागलं आहे. असाच एक प्रकार ठाण्यात घडला असून एका मोबाईल एक्सेसरीज (Mobile Accessories) च्या दुकानात चोरी झाल्याचं समोर आलं आहे. ‘देनेवाला जब भी देता, छप्पर फाड के देता है’, हे तुम्ही ऐकलं असेलच. पण ठाण्यात मात्र ‘छप्पर फाड के’ चोरी झाली आहे!

ठाणे रेल्वे स्थानकाजवळ (Thane Railway Station) ठाणे पश्चिमेकडच्या फलाट क्रमांक २ च्या समोरच एक मोबाईल अॅक्सेसरीजचं दुकान आहे. लॉकडाऊन असल्यामुळे हे दुकान बंदच होतं. मात्र, याचाच फायदा चोरट्यांनी घेतला आणि त्यांनी दुकानात चोरी केली. शुक्रवारी सकाळी दुकानात चोरी झाल्याचं समजताच मालकानं तातडीनं दुकानाकडे धाव घेतली. पोलिसांना त्याची माहिती मिळताच पोलीस तिथे दाखल झाले. दुकान उघडल्यानंतर त्यांना घडलेला प्रकार समजला.

चोरट्यांनी थेट दुकानाचं छप्पर फाडून दुकानात प्रवेश केला होता. दुकानात असलेले काही ब्ल्यू टूथ आणि मोबाईलचे काही सुटे भाग असा ऐवज त्यांनी लंपास केला. दरम्यान, ही घटना नक्की कितीच्या सुमारास घडली त्याबाबत अद्याप निश्चित माहिती समजू शकलेली नाही. ठाणे नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामराव सोमवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे.

First Published on: July 17, 2020 1:18 PM
Exit mobile version