महिलांच्या सुरक्षेसाठी आता आरपीएफ ’दामिनी ’

महिलांच्या सुरक्षेसाठी आता आरपीएफ ’दामिनी ’

मध्य रेल्वे मार्गावरून लोकल प्रवास करणार्‍या महिलांचा प्रवास सुरक्षित व्हावा , यासाठी मध्य रेल्वेकडून महिला सुरक्षेसाठी ‘आरपीएफ दामिनी ’ नावाचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार करण्यात आला होता. मात्र, पाहिजे तेवढा महिला प्रवाशांकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे हा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप पुन्हा बंद करण्याची नामुष्की आरपीएफ पोलिसांवर आली होती. मात्र, आत मध्य रेल्वेने पुन्हा एकदा या ‘आरपीएफ दामिनी ’गु्रपला अद्ययावत करून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी आरपीएफ दलातील महिला पोलिसांना प्रशिक्षण सुध्दा देण्यात येणार आहे.

मुंबईच्या लोकल प्रवासात महिला प्रवाशांना अनकेदा विनयभंग, छेडछाड अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येत आहे. महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी गेल्यावर्षी पश्चिम रेल्वेच्या आरपीएफ विभागाकडून आरपीएफ सखी नावाचे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार करण्यात आला होता. या ग्रुपला महिला प्रवाशांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

पश्चिम रेल्वे पाठोपाठ मध्य रेल्वेच्या आरपीएफ पोलिसांनी ‘दामिनी’ व्हॉटअप ग्रुप तयार केला होता. महिला प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे हा ग्रुप बंद करण्यात आला होता. मात्र आता पुन्हा एकदा मध्य रेल्वे सुरक्षा बलाकडून ‘दामिनी’ व्हॉटअप ग्रुपला अपग्रेट करण्यात येणार आहे. या ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी महिला प्रवाशांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावरून 182 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधून विनंती करायची आहे. त्यानंतर या महिलांना व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपचे सदस्य बनवले जाईल,अशी माहिती आरपीएफ पोलिसांनी दिली आहेत.

असा असणार व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप ’?
‘आरपीएफ दामिनी ’नावाचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप दोन स्थानकांच्या टप्प्यांनुसार असणार आहे. या ग्रुपमध्ये रेल्वे सुरक्षा दलाच्या महिला अधिकारी आणि रेल्वे पोलीस महिला अधिकारी असे एकूण 300 अधिकार्‍यांचा सहभाग असणार आहे. या ग्रुपवर महिला प्रवाशांनी त्यांच्या सुरक्षेबाबतच्या समस्या या ग्रुपवर टाकल्यास त्यावर त्वरित कारवाई करणे शक्य होणार आहे, असे मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या मध्य रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त के.के.अशरफ यांनी सांगितले.

First Published on: October 19, 2019 5:26 AM
Exit mobile version