धारावीतील कोरोनामुक्तीचं ‘रोल मॉडेल’ कुणाचं? सरकार, RSS की NGO

धारावीतील कोरोनामुक्तीचं ‘रोल मॉडेल’ कुणाचं? सरकार, RSS की NGO

नितेश राणेंचा सरकारला टोला

“आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी आणि दाटीवाटीची लोकसंख्या असलेल्या धारावीने स्वंयशिस्त आणि सामुहिक प्रयत्नातून कोरोनावर नियंत्रण ठेवता येते, हे जगाला दाखवून दिले एवढेच नाही तर कोरोना‍विरूद्धच्या लढ्यातील रोल मॉडेल म्हणून जागतिक स्तरावर आपलं नाव नोंदवलं”, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मात्र दुसरीकडे आमदार नितेश राणे यांनी धारावीतील कोरोनामुक्तीचे श्रेय फक्त राज्य सरकारला देणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. WHO ने सत्यपरिस्थिती तपासूनच श्रेय द्यावे, असे ट्विट त्यांनी केले आहे.

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी आणि मुंबईतील कोरोनाचा सर्वात मोठा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीने काही दिवसांतच कोरोनाच संसर्ग नियंत्रणात आणला आहे. आज इथे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२ टक्क्यांवर गेले असून आज ॲक्टीव्ह केसेसची संख्या फक्त १६६ आहे. याची दखल जागतिक आरोग्य संघटनेने घेतली. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अडहॅनम गेब्रेयेसुस यांनी ज्या देशांनी कोरोना नियंत्रणात उत्तम कामगिरी केली त्यांची उदहारणे देतांना धारावीतील एकात्मिक प्रयत्नांचा आवर्जुन उल्लेख केला. जागतिक महामारीच्या परिस्थितीत अशी उदाहरणे आपल्याला साथीच्या प्रादुर्भावातून बाहेर पडण्यासाठी प्रेरणा देऊ शकतात, अशा शब्दात त्यांनी कोरोना नियंत्रणासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतूक केले.

मुख्यमंत्र्यांनीही केले कौतूक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापालिका प्रशासन, स्वंयसेवी संस्था आणि स्थानिक धारावीकर यांच्या एकात्मिक प्रयत्नांचे कौतूक करतांना कोरोना नियंत्रणासाठी केलेल्या कामगिरीबद्दल शाब्बासकी दिली आहे. हे तुमच्या सर्वांच्या एकात्मिक प्रयत्नांचे यश असल्याचे सांगतांना त्यांनी धारावीच्या प्रयत्नांची जागतिक स्तरावर घेण्यात आलेली नोंद ही कोरोना विरुद्धच्या लढ्याला अधिक बळ देणारी असल्याचे म्हटले आहे.

फक्त सरकारला श्रेय देणे चुकीचे

“धारावीमध्ये राष्ट्रीय स्वंयसेवक संघ (RSS) आणि एनजीओंनी दिवसरात्र कोरोनाशी लढा दिला. आपल्या कामाचा गाजावाजा न करता त्यांनी हे काम केले. धारावीतील कोरोनामुक्तीचे सर्व श्रेय केवळ राज्य सरकारला देणे चुकीचे ठरेल. इतर संस्थावर हा अन्याय ठरेल.” असे ट्विट आमदार नितेश राणे यांनी केले आहे.

धारावीचा कोरोनामुक्तीकडचा प्रवास

धारावीचा हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता स्थानिक धारावीकर, मुंबई महानगरपालिका प्रशासन आणि स्वंयसेवी संस्थांचा सहभाग या तिघांच्या एकात्मिक प्रयत्नांचे फलित म्हणून धारावीतील कोरोना साथीच्या नियंत्रणाच्या यशाकडे पहावे लागेल.  कोरोना साथीला नियंत्रित करण्यासाठी स्थानिक लोकांचा सहभाग मिळवणे, चाचण्या करणे, रुग्णांचा शोध घेणे, त्यांचे अलगीकरण करून रुग्णांवर योग्य उपचार करणे, शारीरिक अंतराच्या नियमाचे, स्वच्छतेचे आणि स्वंयशिस्तीचे काटेकोरपणे पालन करणे याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिल्याने कोरोनाची साखळी तोडता येते. हेच धारावीमध्ये दिसून आले आहे.

First Published on: July 11, 2020 5:56 PM
Exit mobile version