दहा दिवसांत १३९४ रिक्षाचालकांवर आरटीओची कारवाई

दहा दिवसांत १३९४ रिक्षाचालकांवर आरटीओची कारवाई

मुंबई : मुंबईतील रिक्षाचालकांची मुजोरी आणि प्रवाशांना लुटण्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत. रिक्षाचालकांच्या या वर्तनामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. अंधेरी आरटीओने अशा सुमारे १३९४ रिक्षाचालकांवर १ ते १० सप्टेंबरदरम्यान कारवाई केली आहे. त्यांच्याकडून दंड वसूल करून त्यांची लायसन्स काही काळासाठी रद्द करण्यात आली आहेत. अडवणूक झालेल्या प्रवाशांसाठी टोल फ्री क्रमांक देण्यात आला आहे.

मुंबई शहरात रिक्षा-टॅक्सी चालकांची मनमानी प्रचंड वाढली असून याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागतो. रिक्षाचालकांनी प्रवाशांना त्यांच्या इच्छितस्थळी पोहोचवणे बंधनकारक आहे. तरीदेखील रिक्षाचालक जवळचे भाडे नाकारताना दिसतात. त्यामुळे प्रवाशांना ताटकळ उभे राहावे लागते. आता असे अडवणूक झालेले प्रवासी आरटीओकडे रिक्षा चालकाची तक्रार करू शकतात. त्यासाठी आरटीओने प्रवाशांसाठी १८००२२०११० हा टोल फ्री क्रमांक सुरू केला आहे. त्या क्रमांकावर प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात आरटीओ कार्यालयात तक्रारी येत आहेत. या आधारे अंधेरी आरटीओ भाडे नाकारणार्‍या, मीटर जलद करणे, उद्धट वागणूक अशा सुमारे १३९४ रिक्षाचालकांवर कारवाई केली आहे. त्यातून ११ लाख ३६ हजारांचा दंडदेखील वसूल केला आहे. ही कारवाई १ ते १० सप्टेंबरदरम्यान करण्यात आली आहे. ज्यामध्ये भाडे नाकारणार्‍या १४९, जास्तीचे भाडे आकारणार्‍या १४२, मीटर फास्ट करणार्‍या ७७, उद्धट वर्तन करणार्‍या १०२६ अशा एकूण १३९४ जणांवर कारवाई करण्यात आलेली आहे.

मुंबईत सुमारे १ लाख रिक्षा धावतात. अंधेरी आरटीओने मागील १० दिवसांत आलेल्या तक्रारींवर कारवाई करणे सुरू केले आहे. या कारवाईमध्ये अंधेरी आरटीओने ६७ जणांचे लायसन्स, तर ८२ जणांचे परमीट काही काळासाठी रद्द केले आहे.

आरटीओने प्रवाशांसाठी टोल फ्री क्रमांक सुरू केला आहे. त्याच्या माध्यमातून आलेल्या तक्रारींवर आम्ही कारवाई करीत आहोत. प्रवाशांनीही या टोल फ्री क्रमांकावरून तक्रार करून प्रशासनाला सहकार्य करावे.
– अभय देशपांडे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, अंधेरी आरटीओ.

First Published on: September 20, 2018 2:26 AM
Exit mobile version