मराठा आरक्षणासाठी भांडतो म्हणून पोटात दुखतं का? – धनंजय मुंडे

मराठा आरक्षणासाठी भांडतो म्हणून पोटात दुखतं का? – धनंजय मुंडे

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सध्या विधानपरिषदेमध्ये गोंधळ सुरु आहे. ओबीसी असून मराठा आरक्षणासाठी भांडत असल्यामुळे सत्ताधारी माझ्या विरोधात असल्याची टीका धनंजय मुंडे यांनी विधानपरिषदेत केली आहे. मागास आयोगाचा अहवाल पटलावर ठेवणार का? तुम्ही एटीआर कधी ठेवणार असे सवाल करत धनंजय मुंडे यांनी सरकारला धारेवर धरले.

एटीआर आणा

विधेयक आणि एटीआर हे सरकार एकाच दिवशी ठेवणार आहे. एटीआर कधी येणार हे देखील आम्ही विचारायचे नाही का? असा सवाल धनंजय मुंडे यांनी केला आहे. हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाचे फक्त दोन दिवसचं राहिले आहेत. चर्चा महत्वाची आहे. आज तुम्ही एटीआर आणा अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे.

ओबीसी असून मराठा आरक्षणासाठी भांडतो

काल या सदनात सभागृहाच्या नेत्यांसहीत मी मराठा समाजाच्या आरक्षणास विरोध करतो असा आरोप करत पायऱ्यांवर बसून माझ्या विरोधात घोषणाबाजी दिली. आज सव्वाशे आमदार अहवाल पटलावर ठेवा असे म्हणतात. पण फक्त धनंजय मुंडे यांच्या विरोधात घोषणाबाजी करतात. मी ओबीसी आहे आणि मराठा आरक्षणासाठी भांडतो म्हणून तुमच्या पोटात दुखत का? असा सवाल धनंजय मुंडे यांनी केला आहे.

सभापती संतापले

मराठा आरक्षणावरुन विधानपरिषदेमध्ये गोंधळ झाल्यामुळे सभापती संतप्त झाले आहेत. तुम्हाला आजही सभागृह चालवायचे नाही का? असा संतप्त सवाल सभापतींनी सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांना विचारत चांगले झापले आहे.

First Published on: November 28, 2018 2:15 PM
Exit mobile version