ठाणे, रायगड परिसरात महावितरणला ७०० कोटी रुपये थकबाकीचा शॉक

ठाणे, रायगड परिसरात महावितरणला ७०० कोटी रुपये थकबाकीचा शॉक

Mahavitaran

नवी मुंबई : महावितरणला भांडुप परिमंडळाला मोठ्या प्रमाणात थकबाकीचा फटका बसला आहे. पावसाळ्यात विजेची मागणी कमी होऊन देखील अचल ग्राहकांनी आणि स्थिर ग्राहकांनी महावितरणला तब्बल ७०० कोटी रुपयांना थकवले आहे.

भांडुप परिमंडळ ऐरोली ते पनवेल परिसरात पसरले आहे. अवघे तीन टक्के वीजगळती आणि ९७ टक्के वसुलीचा टेंभा मिरवणार्‍या वीज कंपनीला आता ठाणे , रायगड जिल्ह्यात असलेली सुमारे ७०० कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्याचे आवाहन आहे. भांडुप महावितरण विभागाने या थकबाकीदारांची यादी घोषित केली आहे.

विजेचा वापर करून देखील वीज भरणा केला नाही अशा 5 लाख 22 हजार 752 ग्राहकांनी बिले थकवली आहेत. यामध्ये घरगुती ग्राहकांनी 119 कोटी थकविले असून व्यावसायिक ग्राहकांनी 50 कोटी थकविले आहेत. इतर ग्राहकांनी 123 कोटी रुपये थकविले आहेत. उच्चदाब जोडणी असलेल्या ग्राहकांनी 388 कोटी रुपये थकविल्याने ही करोडोची वसुली आता महावितरणच्या अधिकार्‍यांना डोकेदुखी ठरली आहे.

खारघर परिसरात प्रायोगिक तत्वावर प्रीपेड मीटर योजना राबवूनसुद्धा थकबाकीच्या समस्येला महावितरण कंपनीला सामोरे जावे लागत आहे. भारनियमन अचानक वीज पुरवठा खंडित होण्याच्या समस्येबरोबर वीज तुटवडा याबाबत पुण्यानंतर नवी मुंबई परिसर नशीबवान असल्याने आणि महसूल वसुलीत दुसर्‍या क्रमांकावर असल्याने राज्यभरात भारनियमन लागू असताना नवी मुंबई शहराला यामधून वगळण्यात आले होते. कोळसा उपलब्ध नसल्याने आणि विजेचा वापर वाढल्यामुळे राज्यात तातडीचे भारनियमन लागू करण्यात आले होते.

दीड ते दोन हजार मेगावॅटची तूट असल्याने महावितरणने हा निर्णय घेतला होता. आतापर्यंत ग्रामीण भागापुरता मर्यादित असलेले हे भारनियमन यानंतर शहरी भागाकडेही होऊ लागल्याने याचा फटका नवी मुंबई शहराला बसू लागला आहे.

First Published on: September 17, 2018 2:29 AM
Exit mobile version