मुंबई विद्यापीठात महिला कर्मचार्‍यांची सुरक्षा वार्‍यावर

मुंबई विद्यापीठात महिला कर्मचार्‍यांची सुरक्षा वार्‍यावर

प्रत्येक सरकारी कार्यालयामध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना केल्या जातात. मात्र नॅक नामांकनात राज्यात अव्वल असल्याचा डंका पिटणार्‍या मुंबई विद्यापीठामध्ये महिला कर्मचारी व अधिकार्‍यांना सुरक्षा व पायाभूत सुविधा पुरवण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे उघडकीस आले आहे. महिला कर्मचार्‍यांना वाईट सोयीसुविधा पुरवण्यासाठीच मुंबई विद्यापीठाला नॅकमध्ये गुण मिळाले आहे का, असा प्रश्नही महिला कर्मचारी व सिनेट सदस्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट कॅम्पसमध्ये २०० पेक्षा अधिक महिला अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. या महिला कर्मचार्‍यांना वैयक्तिक देखरेखीसाठी स्वतंत्र कक्ष देण्याची मागणी सिनेट सदस्य अ‍ॅड. वैभव थोरात यांनी २०२० मध्ये अधिसभेत केल्यानंतर तत्कालीन कुलसचिव अजय देशमुख यांनी आठ दिवसांमध्ये सोयीसुविधांनी युक्त कक्ष उपलब्ध करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर १३७-अ ही खोली महिला कक्ष म्हणून उपलब्ध करून दिली. मात्र हा कक्ष उपलब्ध करून देताना महिलांच्या सुरक्षेबाबत कोणताही विचार करण्यात आलेला नाही. या खोलीच्या तुटलेल्या खिडक्या, खिडक्यांना पडदे नाही, तुटलेल्या लाद्या, तुटलेल्या खुर्च्या, दरवाजांना कड्या नाही, खोलीमध्ये घाणीचे साम्राज्य अशा वाईट अवस्थेतील खोली महिलांना विशेष कक्ष म्हणून देण्यात आली आहे. हा कक्ष पाहिल्यावर अनेक महिला कर्मचार्‍यांनी ‘भीक नको पण कुत्रे आवर’ अशी परिस्थिती विद्यापीठाने केली असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.

दोन वर्षापूर्वी विद्यापीठातील एका महिला कर्मचार्‍यांचा अचानक रक्तदाब वाढल्याने त्यांना चक्कर आली होती. मात्र महिला कक्षच नसल्याने या महिलेला तिच्या सहकार्‍यांना कार्यालयात जमिनीवर झोपवावे लागले होते. महिला कक्षामध्ये आवश्यक सोयीसुविधा पुरवण्याकडे दुर्लक्ष करण्याबरोबर विद्यापीठाने कक्षाच्या जागेबाबतही उदासीनता दाखवली आहे. नुकतेच मुंबई विद्यापीठाला नॅकच्या समितीने दिलेल्या भेटीपूर्वी हा कक्ष गोदाम म्हणून वापरण्यात येत होता. त्याच कक्षाला बाहेरून रंगरगोटी करून महिला कक्ष बनवण्यात आला आहे. या कक्षामध्ये आजूबाजूला गोदामेच असल्याने महिलांना या गोदामातून प्रवेश करावा लागत आहे. त्यामुळे महिलांना या गोदामे ओलांडून महिला कक्षामध्ये प्रवेश करावा लागत आहे. त्यामुळे हा कक्ष सुरू करताना महिला कर्मचारी व अधिकार्‍यांच्या सुरक्षेचा कोणताच विचार विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आलेला दिसून येत नाही. त्यामुळे ही खोली बदलून सुरक्षित ठिकाणी सर्व सोयीसुविधांनी युक्त कक्ष उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी विद्यापीठातील महिला कर्मचार्‍यांकडून मुंबई विद्यापीठातील युवासेनेचे सिनेट सदस्य अ‍ॅड. वैभव थोरात यांच्याकडे केली होती. याची दखल घेत थोरात यांनी कुलगुरू सुहास पेडणेकर यांच्याकडे मागणी केली आहे.

महिला कक्ष पाहिल्यावर विद्यापीठ प्रशासन महिलांबाबत इतके असंवेदनशील कसे काय असू शकते, असा प्रश्न पडतो. विद्यापीठाने महिला कर्मचार्‍यांना तातडीने सोयीसुविधायुक्त महिला कक्ष उपलब्ध न केल्यास शिवसेना स्टाईलने विद्यापीठाला दणका देण्यात येईल.
-अ‍ॅड. वैभव थोरात, सिनेट सदस्य, युवासेना, मुंबई विद्यापीठ

First Published on: February 12, 2022 9:39 PM
Exit mobile version