मोरपिसांच्या विक्रीमागे गौडबंगाल?

मोरपिसांच्या विक्रीमागे गौडबंगाल?

Morpis

राष्ट्रीय पक्षी मोरांची पिसे विक्री करताना बाजारपेठेत आणि जत्रा उत्सवामध्ये काही इसम नजरेस पडतात. मोरांची पिसे ते कुठून आणतात याबाबत संशयाचे वातावरण आहे. मोरांच्या पिसांची मोठ्या प्रमाणात विक्री करण्याचा हा प्रकार खुलेआम सर्वत्र सुरू असताना राज्य सरकारच्या वन्यजीव विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. एकीकडे राज्यात मोरांची संख्या कमालीची घटत असताना दुसरीकडे केवळ मोरांची पिसे मिळवण्यासाठी मोरांची शिकार्‍यांकडून हत्या केली जाते का? असा प्रश्न वन्यजीव पक्षीप्रेंमीकडून आता विचारला जात आहे.

ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागासह उपनगर व मुंबई महानगरातही मोरांची पिसे सहज उपलब्ध होत आहेत. शहरांतील काही पिकनिक स्पॉटवर तर ग्रामीण भागांतील बाजारपेठेत जत्रा उत्सवात काहीजण मोरांची पिसे विकताना दिसतात. 10 ते 20 रुपयांच्या भावाने मोरांच्या पिसांची विक्री ग्राहकांना ते करतात. अत्यंत आकर्षक दिसणारी ही मोरांची पिसे मोठ्या प्रमाणावर ग्राहकांकडून खरेदी केली जातात. घरामध्ये शोसाठी लावण्याकरिता व देव्हार्‍यांत ठेवण्यासाठी मोरांच्या पिसांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. असे जरी असले तरी शोपिस व आपल्या हौशेसाठी विक्रीला येणारी ही मोराची पिसे येतात तरी कुठून हा मात्र संशोधनाचा विषय ठरतो. मात्र, वन्यजीव विभागाचे मोर पिसांची विक्री करणार्‍यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. याबाबत माहिती घेण्यासाठी तानसा वन्यजीव विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक दिपक मते यांना विचारले असता त्यांनी सांगितले की जेव्हा जंगलात मोर नाचतात तेव्हा त्यांची मोठ्या प्रमाणावर पिसे गळतात. आणि ही गळालेली पिसे जंगलात वेचून ती विक्रीला आणली जात असावीत, असे त्यांनी सांगितले.

जंगलात वेचलेली मोरांची पिसे ते विकु शकतात. मात्र, मोरांची हत्या करून त्यांच्या पिसांची विक्री करणे हा गंभीर गुन्हा आहे. वन्यजीव नियमानुसार त्या शिकार्‍यास तीन वर्ष तुरुंगवास होऊ शकतो. असे वनसंरक्षक दिपक मते यांनी माहिती देताना सांगितले. मात्र येवढ्या प्रमाणावर जर मोर पिसांची विक्री होत असेल तर ही पिसे कुठून आणली जातात याची चौकशी आणि तपास करण्याची गरज असल्याची पक्षीप्रेमींची मागणी आहे.

शहापूर तालुक्यातील 320 चौरस किलोमीटरच्या तानसा अभयारण्याच्या क्षेत्रात शहापूर, तानसा , पडघा, पिवळी, खर्डी, वैतरणा, वाडा , परळी, सूर्यमाळ अशा विस्तीर्ण जंगलात एकूण 34 मोर असल्याची नोंद वन्यजीव विभागाच्या शासकीय कागदोपत्री आहे. एवढ्या मोठ्या अभयारण्यात फक्त 34 मोरांची संख्या असल्याबाबत मोठे आश्चर्य व्यक्त होत आहे.

First Published on: March 27, 2019 4:25 AM
Exit mobile version