संभाजीराजेंनी घेतली विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची भेट, म्हणाले…

संभाजीराजेंनी घेतली  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची भेट, म्हणाले…

Sambhaji Raje met Leader of Opposition Devendra Fadnavis

राज्यसभेतील राष्ट्रपती नामनियुक्त सदस्यपदाची  मुदत संपल्यानंतर  माजी खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी मंगळवारी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी आपली पुढील राजकीय भूमिका पुण्यात १२ मे ला पत्रकार परिषदेत जाहीर करणार असल्याची घोषणा केली. संभाजी राजे राजकीय पक्षाची घोषणा करणार नसले तरी राजर्षी शाहू महाराज यांच्या नावाने स्वतंत्र फ्रंट स्थापन करून त्यामाध्यमातून आपले राजकारण आणखी गतिमान करण्याची शक्यता आहे.

भाजपने  संभाजी राजे यांना  राष्ट्रपती नामनियुक्त सदस्य म्हणून  २०१६ मध्ये राज्यसभेवर पाठविले होते. त्यांची सहा वर्षाची मुदत संपल्याने आता त्यांना भाजप पुन्हा राज्यसभेवर पाठविणार की नाही याबाबत साशंकता आहे.  या पार्श्वभूमीवर संभाजी राजे यांनी आज  सकाळी  फडणवीस यांची  त्यांच्या सागर निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत राजकीय चर्चा झाली असली तरी ती सांगण्यास संभाजी राजे यांनी नकार दिला.

मला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसभेवर पाठवून देशासाठी,  समाजासाठी काम करण्याची संधी दिली. त्यामुळे मी त्यांचे आभार मानण्यासाठी आलो आहे. मी राजकारणात राहण्याचे  ठरविले आहे आणि पुढेही राजकारण करणार आहे. मात्र या राजकारणाची पुढची दिशा ही १२ तारखेला जाहीर करेन, असे त्यांनी सांगितले. तत्पूर्वी ते  ११ तारखेला आपल्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत.
ओबीसी आरक्षणाला पाठिंबा
आपला ओबीसी आरक्षणाला पाठिंबा आहे. अठरा पगड जाती आणि बारा बलुतेदार मिळून बहुजन समाज तयार झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी बहुजन समाजाला घेऊन राज्य निर्माण केले आणि राजर्षी शाहू महाराज यांनी या बहुजनांना पहिले आरक्षण दिले. त्यामुळे छत्रपती घराण्याचा वंशज म्हणून मराठा समाजाबरोबर बहुजन समाजाच्या हिताचा आपला विचार आहे. त्यात ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे हीच आपली भावना आहे, असे संभाजी राजे यांनी स्पष्ट केले.

First Published on: May 10, 2022 3:48 PM
Exit mobile version