मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर प्राणघातक हल्ला

मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर प्राणघातक हल्ला

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यावर शुक्रवारी सकाळी दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात ४ अज्ञात इसमांनी प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात संदीप देशपांडे यांना दुखापत झाल्याने त्यांना तात्काळ नजीकच्या हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. देशपांडे यांच्या हाताला फ्रॅक्चर झाले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मनसे नेते संतोष धुरी यांनी दिली. उपचारानंतर देशपांडे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यावर अशा भ्याड हल्ल्यांना मी भीक घालत नाही, अशी प्रतिक्रिया संदीप देशपांडे यांनी दिली. याप्रकरणी शिवाजी पार्क पोलीस स्थानकात चारही मारेकर्‍यांविरोधात हत्येच्या प्रयत्नासह शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. विशेष म्हणजे याप्रकरणी देशपांडे यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात मारेकर्‍यांनी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे आणि युवासेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांची नावे घेतल्याचे म्हणत हल्ल्यामागे ठाकरे आणि सरदेसाईंचा हात असल्याकडे अंगुलिनिर्देश केला आहे.

संदीप देशपांडे सकाळी सव्वासातच्या सुमारास मॉर्निंग वॉकला छत्रपती शिवाजी महाराज मैदानात गेले होते. यावेळी अचानक ४ अज्ञात इसमांनी त्यांना क्रिकेट बॅट आणि स्टम्पने मारहाण करण्यास सुरुवात केली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे संदीप देशपांडे जखमी होऊन खाली कोसळले. हा प्रकार लक्षात येताच मैदानातील काही लोकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला असता हल्लेखोरांनी पळ काढला. हल्लेखोरांनी चेहर्‍यावर रुमाल बांधला होता. हल्ल्यानंतर त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

देशपांडे यांच्यावरील हल्ल्याचे वृत्त समजताच मनसेप्रमुख राज ठाकरे, अमित ठाकरे, भाजप आमदार नितेश राणे, शिवसेना आमदार सदा सरवणकर यांनी रुग्णालयात भेटून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली, तर पोलिसांनी देशपांडे यांच्या राहत्या घरी जाऊन त्यांचा जबाब नोंदवला. या जबाबानंतर पोलिसांनी ३०७, ५०४, ५०६ (२) भादंविसह क्रिमिनल अ‍ॅमेंडमेंट अ‍ॅक्ट ७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि काही संशयितांना ताब्यात घेऊन चौकशीही सुरू केली आहे.

आदित्य ठाकरे लक्ष्य
मनसे नेते अमेय खोपकर यांनी या हल्ल्यामागे ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांचा हात असल्याचा आरोप करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दोघांच्या चौकशीची मागणी केली, तर उठसूठ ठाकरेंवर चुकीचे आरोप करून प्रसिद्धी मिळवण्यापेक्षा पक्षाच्या कामाकडे लक्ष द्या, असा उपरोधिक टोला आदित्य ठाकरेंनी लगावला.

First Published on: March 4, 2023 5:30 AM
Exit mobile version