झोपडपट्ट्यांतील शौचालयांमध्ये सॅनिटरी वेंडिग, इनसिनेटर मशीन

झोपडपट्ट्यांतील शौचालयांमध्ये सॅनिटरी वेंडिग, इनसिनेटर मशीन

सॅनिटरी वेंडिग मशीन

मुंबई शहर व उपनगरांतील झोपडपट्ट्यांतील सामूहिक शौचालयांमध्ये सॅनिटरी नॅपकीन वेंडिग मशीनसह स्वयंकट सॅनिटरी नॅपकीन इनसिनेटर्स मशीन बसवण्यात येणार आहे. यासाठी २३५ मशीन्सची खरेदी करण्यात येणार आहे. त्यामुळे महिलांना सामूहिक शौचालयांमध्येच सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध होणार असून त्यांची विल्हेवाट शास्त्रोक्तपणे लावण्याची व्यवस्थाही तिथेच करण्यात येणार आहे.

मुंबईत मोठ्या प्रमाणात झोपडपट्टीवस्ती असून लोकांसाठी घराघरांमध्ये शौचालय उभारता येत नसल्याने वस्त्यांमध्ये सामूहिक शौचालये बांधण्यावर महापालिकेच्यावतीने भर दिला जातो. आतापर्यंत वस्ती स्वच्छता कार्यक्रमांतर्गत मुंबईमध्ये लॉट क्रमांक १ ते ९ अंतर्गत विविध ठिकाणी ६५२ ऐवढी शौचालये बांधण्यात आली आहेत. झोपडपट्टीमधील ज्या स्त्रिया सॅनिटरी नॅपकीन वापरतात, त्यांना सॅनिटरी नॅपकीनची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यासाठी सोय उपलब्ध नसते. अनेकदा हे नॅपकीन कचर्‍यात टाकले जातात. ज्यामुळे रोगराई पसरणे, जंतूसंसर्ग होणे असे धोके संभवतात. काही वेळा या नॅपकीन वापरानंतर शौचकुपात टाकल्या जातात. त्यामुळे शौचालयांच्या मलवाहिन्या तुंबणे, मलकुंड भरून वाहणे अशा समस्या निर्माण होतात.

इनसिनरेटर मशीनमध्ये सॅनिटरी नॅपकीन जाळून त्याचे राखेत रुपांतर करण्याची पध्दत उपलब्ध आहे. यापूर्वी महापालिका शाळांमधून अशा प्रकारची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार आता या बाबीचा विचार करता मुंबईतील २३५ सामूहिक शौचालयांमध्ये सॅनिटरी नॅपकीन वेंडिग मशीन व इनसिनलेटर मशीन बसवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी अमी एंटरप्रायझेस कंपनीची निवड करून त्यांना १३.५७ कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे. सॅनिटरी नॅपकीन वेंडिग मशीनचा पुरवठा, इनसिनरेटर मशीनचा पुरवठा, सॅनिटरी नॅपकीनचा पुरवठा, धातुंच्या नाण्यांचा पुरवठा, तसेच यासाठीची उभारणी व देखभालीची जबाबदारी या कंत्राटदारावर असेल.

First Published on: April 19, 2019 4:44 AM
Exit mobile version