नॅशनल पार्कमधल्या बिबट्यांना रेडिओ कॉलर बसवणार !

नॅशनल पार्कमधल्या बिबट्यांना रेडिओ कॉलर बसवणार !

मुंबईतील बिबट्या (सौजन्य न्यू सायंटीस्ट)

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (नॅशनल पार्क) विभागाने बिबट्यांच्या व्यावास्थापणासाठी रेडिओ कॉलर यंत्रनेची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत एक विशेष करार वाइल्डलाईफ कंजरर्व्हेशन सोसायटी (wcs) संस्थेसोबत करण्यात आला आहे. यापुढील दोन वर्षांसाठी एक अभ्यास प्रकल्प सुरु केला जाणार असून त्यात रेडिओ कॉलरिंग तंत्राचा वापर करून बिबट्याचा अभ्यास करण्यात येणार आहे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि आजुबाजूच्या परिसरात बिबटे कसे वावरतात हे जाणून घेणे या प्रकल्पाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. बिबट्याच्या कॉलरमधील सिग्नल उपग्रहाकडे पाठवला जातो आणि त्यासोबतच तारीख आणि वेळेची नोंद होते. वन अभ्यासक आणि विविध संशोधनासाठी या माहितीचे जतन केले जाते. एखादा प्राणी कुठे आहे? काय करत आहे? याचा प्रत्यक्ष शोध घेता येतो.

बिबट्या हा स्वभावाने संकोची आणि बुजरा प्राणी आहे. त्याच्या या स्वभावाचे निरीक्षण करणे अवघड जाते. परंतु कॅमेरा ट्रेपिंग आणि रेडिओ कॉलरिंग या दोन्ही तंत्रांचा वापर करून त्याबद्दल खूप माहिती मिळू शकते. गेले तीन वर्ष या परिसरात कॅमेरा ट्रेपिंगचा वापर केला जात असून आता यामध्ये कॉलरिंग तंत्रज्ञानाची भर पडणार आहे.
२००९ साली अहमदनगर वन विभागात बिबट्यांना रेडिओ कॉलर बसवण्यात आले होते. यापैकी आजोबा असे नाव असलेल्या एक बिबट्या माळशेज घाटातून १२५ किलोमीटर अंतर प्रवास करत मुंबईला पोहोचला होता. दोन वर्ष राहिल्यानंतर डिसेंबर २०११ मध्ये त्याचा मृत्यू झाला होता. रेडिओ कॉलरींग केलेला हा सर्वात पहिला बिबट्या होता
सध्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ३० हून अधिक बिबटे आहेत त्यापैकी ५ बिबट्यांना रेडिओ कॉलरींग करण्यात येणार आहे. जीवशास्त्रज्ञ तसेच वन विभागाचे अधिकारी एकत्र मिळून या बिबट्यावर लक्ष ठेवतील.

या प्रकल्पाद्वारे मुंबईत प्रथमच बिबट्याला कॉलर बसवण्यात येणार आहे. ही खूप आनंदाची गोष्ट आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हा मुंबईच्या नागरिकांसाठी मोलाचा ठेवा आहे. या उद्यानाचे व्यवस्थापण शास्त्रशुद्ध पद्धतीने करणे हेच आमच्या कामाचे उद्दिष्ट आहे.
– डॉ. अन्वर अहमद, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे संचालक

First Published on: May 26, 2018 11:37 AM
Exit mobile version