‘सरकार पाडून दाखवाच’, संजय राऊतांचं भाजपला थेट आव्हान!

‘सरकार पाडून दाखवाच’, संजय राऊतांचं भाजपला थेट आव्हान!

राजस्थानमध्ये सत्तापालटाच्या हालचाली सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात देखील भाजपकडून सत्तापालटाच्या चर्चा सुरू झाल्या असताना भाजपकडून देखील महाराष्ट्रातलं सरकार पडण्याचे ऑक्टोबर महिन्यातले ‘मुहूर्त’ सांगितले जात आहेत. यावर आता शिवसेना खासदार आणि नेते संजय राऊत यांनी परखड टीका केली आहे. ‘विरोधकांनी आधी सरकार पाडून दाखवावं आणि नंतर म्हणावं आम्ही पाडलं. नुसतं रोज सरकार पाडू पाडू म्हणून काही होणार नाही’, असं संजय राऊत म्हणाले. एका खासदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या सगळ्यावर आपली रोखठोक भूमिका मांडली.

काय म्हणाले संजय राऊत?

‘ऑपरेशन लोटस वगैरे महाराष्ट्रात चालणार नाही. कोणतीही चुकीची गोष्ट महाराष्ट्रात चालणार नाही. तुम्ही कोणत्याही मार्गाने सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करता, तेव्हा तुम्ही लोकशाहीला अस्थिर करण्याचा प्रयत्न करता. मग तुम्हाला लोकशाहीवर बोलण्याचा अधिकार राहात नाही. ५ वर्ष तुम्हाला सरकार बदलण्याचा प्रयत्न करावा लागेल. सत्तापालटाचा असा मुहूर्त काढणं म्हणजे सत्तेचा आणि पैशाच्या गैरवापराचा माज आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात महाराष्ट्र उत्तम सुरू आहे. मध्यप्रदेश नंतर त्यांनी राजस्थानचं सरकार पाडण्याची तयारी सुरू केली आहे. यांना वाटलं तर ते अमेरिकेचं देखील सरकार पाडायची तयारी करतील. सरकार पाडण्याच्या या विचारातून त्यांनी बाहेर पडलं पाहिजे. देशावर कोरोनाचं भयंकर संकट आहे. पण त्याचं गांभीर्य त्यांना वाटत नाही. फक्त एखाद्या राज्यात आमचं सरकार नाही, हे तर त्यांना संकट वाटत असेल, तर सगळं कठीण आहे’, असं राऊत यावेळी म्हणाले.

विरोधकांच्या पायाखालीही सतरंजी!

दरम्यान, संजय राऊत यांनी यावेळी भाजपला इशारा देखील दिला आहे. ‘सगळ्यात आधी आपल्याला राज्यावरचं आर्थिक, आरोग्यविषयक, बेरोजगारीचं संकट निभावून न्यावं लागेल. पण तुम्ही फक्त सरकार पाडण्याचे प्रयत्न करताय. तुम्ही सरकार पाडून दाखवा आणि नंतर सांगा आम्ही पाडलं. रोज कशाला बोलताय पाडणार म्हणून. तुम्ही सरकार पाडून दाखवा. तुमच्याही पायाखाली सतरंजी आहे ती देखील कुणालातरी खेचता येते. आकड्यांवर जाऊ नका. आकडे इतरांना देखील खेचता येतात. या गोष्टीतून विरोधी पक्षांनी बाहेर पडायला हवं. माझी त्यांना हात जोडून विनंती आहे की पहिल्यांदा राज्य वाचवायला हवं. मग सरकार पाडण्याचा मुहूर्त आम्ही त्यांना देऊ’, असं राऊत म्हणाले.

सत्तेचा अमरपट्टा कुणाकडेही नाही…

‘विरोधी पक्षाला जर काही खेळ खेळायचे असतील, तर त्यांनी खेळावेत. देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर खेळ खेळतायत. त्यांनी सरकारला मार्गदर्शन केलं पाहिजे. त्यांच्या प्रश्नांची दखल घेतली जाईल. सत्तेचा अमरपट्टा कुणीही बांधून आलेलं नाही. भलेभले येऊन गेले. त्यामुळे त्यांच्यापुढे आपण कोण आहोत. राज्य वाईट परिस्थितीतून जात असताना अशा प्रकारचे मुहूर्त काढणं चूक आहे. देशात असं संकट उभं असताना सरकार पाडण्याचा प्रयत्न कुणीही करू नये’, असं देखील राऊतांनी यावेळी बोलताना नमूद केलं.

First Published on: July 12, 2020 12:25 PM
Exit mobile version