कराची नंतर, आधी POKचं बघा; फडणवीसांच्या वक्तव्यावर राऊतांचा पलटवार!

कराची नंतर, आधी POKचं बघा; फडणवीसांच्या वक्तव्यावर राऊतांचा पलटवार!

पूर्वाश्रमीचे मनसे नेते आणि आता शिवसेनेत असलेले नितीन नांदगावकर यांनी मुंबईतल्या प्रसिद्ध कराची स्वीट्सच्या दुकानात जाऊन राडा घातला आणि कराची हे नाव काढून टाकण्याची अट घातली. त्यानंतर हे कराची महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलंच ‘व्हायरल’ होऊ लागलं आहे. त्यावरूनच आता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टिप्पणीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खोचक पलटवार केला आहे. त्यामुळे मुंबईतला हा कराची वाद थेट पाकव्याप्त काश्मीरपर्यंत जाऊन पोहोचला आहे.

नितीन नांदगावकरांच्या राड्यानंतर संजय राऊतांनी ‘ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही’, असं स्पष्ट करून कराची स्वीट्सच्या नावावर शिवसेनेचा कोणताही आक्षेप नाही हे स्पष्ट केलं. त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीसांनी ‘आपला अखंड भारतावर विश्वास असून एक दिवस कराची देखील भारताचाच भाग असेल’, अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यावर बोलताना संजय राऊतांनी ‘आधी पाकव्याप्त काश्मीर (POK) भारतात आणा, कराचीला आपण नंतर जाऊ’, असं म्हणत खोचक टीका केली.

दरम्यान, यावेळी बोलताना संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस-अजित पवार यांच्या शपथविधीला झालेल्या वर्षपूर्तीवर देखील भाष्य केलं. ‘शपथविधी झाला ती पहाट नसून अंधकार होता. पुढची चार वर्ष नव्हे, तर त्यानंतर देखील असा प्रकार पुन्हा घडणार नाही. फडणवीस अजून त्या धक्क्यातून सावरले नाहीत आणि तेव्हापासून त्यांना झोपही लागलेली नाही’, असं देखील संजय राऊत म्हणाले.

First Published on: November 23, 2020 3:46 PM
Exit mobile version