Satish Kaushik यांचा मृत्यू, मित्राच्या फार्म हाऊसमधून सापडली संशयास्पद औषधं

Satish Kaushik यांचा मृत्यू, मित्राच्या फार्म हाऊसमधून सापडली संशयास्पद औषधं

अभिनेता-दिग्दर्शक सतीश कौशिक आता या जगात नाहीत. होळीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी या अभिनेत्याचे निधन झाले. अभिनेते अनुपम खेर यांनी सर्वप्रथम सोशल मीडिया पोस्टद्वारे या दुःखद बातमीची माहिती दिली. प्राथमिक तपासणीच्या आधारे, अभिनेत्याच्या मृत्यूचं कारण हृदयविकाराचा झटका असल्याचं सांगण्यात आलं. पण आता या प्रकरणात एक नवा खुलासा झाला आहे. दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश कौशिकचा मृत्यू संशयास्पद परिस्थितीत झाला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांचे पथक फार्म हाऊसमध्ये तपासणीसाठी गेले असता पोलिसांना काही ‘आक्षेपार्ह औषधं’ सापडली. सध्या पोलीस सतीश कौशिक यांचा सविस्तर पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि व्हिसेरा रिपोर्टची वाट पाहत आहेत. त्यानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होईल.

सतीश कौशिक होळीचा सण साजरा करण्यासाठी मुंबईहून दिल्लीत आले होते. येथे त्यांनी होळीच्या एका पार्टीला हजेरी लावली होती. त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण शोधण्यासाठी दिल्ली पोलिसांनी होळी पार्टीच्या वेळी फार्महाऊसवर उपस्थित असलेल्या पाहुण्यांची संपूर्ण यादी तयार केली आहे. सतीश कौशिक यांच्या मृत्यूनंतर फरार झालेल्या उद्योगपतींचीही पोलिसांना चौकशी करायची आहे.

एएनआय न्यूज एजन्सीनुसार, दिल्ली पोलिसांनी म्हटलंय की, ‘सतीश कौशिक यांच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी ते तपशीलवार पोस्टमॉर्टम रिपोर्टची वाट पाहत आहेत. जिल्हा पोलिसांच्या गुन्हे पथकाने दक्षिण पश्चिम दिल्लीतील होळी पार्टी सुरू असलेल्या फार्महाऊसमधून काही ‘औषधे’ जप्त केली आहेत. हे फार्म हाऊस सतीश कौशिक यांचे मित्र विकास मालू यांचे आहे. विकास मालू याच्यावर बलात्काराचा गुन्हा असल्याचीही माहिती पोलिसांना मिळाली आहे. हा गुन्हा केव्हा आणि कुठे दाखल झाला, याचा शोध पोलीस घेत आहेत.

पोस्टमॉर्टममध्ये काहीही संशयास्पद आढळले नसल्याचे पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. डॉक्टरांनी याला केवळ हृदयविकाराचा झटका असल्याचे म्हटले आहे. मृतदेहाच्या उर्वरित भागात काय होते, हे संपूर्ण पोस्टमॉर्टम रिपोर्टनंतर स्पष्ट होईल. त्यासाठी बिसराचा नमुना जतन करण्यात आला आहे. सतीश कौशिक यांना रुग्णालयात नेण्यापूर्वी पोलिसांना कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. फोर्टिस रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच सतीश कौशिक यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर रुग्णालयाकडून पोलिसांना कळवण्यात आले. ते दिल्लीहून आले असल्याने दिल्ली पोलिसांनी त्यांचे पोस्टमॉर्टम दिल्लीतील हरिनगर येथील दीनदयाळ रुग्णालयात वैद्यकीय मंडळाकडून केले जाईल, असा निर्णय घेतला. सतीश कौशिक यांना रुग्णालयात नेणारे लोक त्यांच्या संपर्कात असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. लवकरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असा विश्वास आहे.

First Published on: March 11, 2023 12:44 PM
Exit mobile version