महाविद्यालयांमध्येही विद्यार्थ्यांची ‘आरे वाचवा’ मोहीम

महाविद्यालयांमध्येही विद्यार्थ्यांची ‘आरे वाचवा’ मोहीम

'आरे वाचवा' मोहीम

‘आरे’ जंगल वाचविण्यासाठी सध्या चर्चेत असलेल्या ‘आरे वाचवा’ मोहीमेने चांगलाच जोर धरला असून आता यात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीही सहभाग नोंदवायला सुरुवात केली आहे. याच अनुषंगाने रुईया महाविद्यालयाच्या बाहेर ‘पुरोगामी विद्यार्थी संघटना’ आणि ‘स्टुडंट्स फॉर आरे’ तर्फे ‘आरे वाचवा’ स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. अनेक विद्यार्थ्यांनी स्वाक्षरी करून या मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग दर्शविला. त्याचबरोबर ‘जंगल कसं महत्वाचं आहे’, यावर विद्यार्थ्यांनी आपली मतंही नोंदवली. रुईयासोबतच इतर महाविद्यालयातही ही मोहीम राबविली जाणार असून विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून आरे वाचवण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन ‘स्टुडंट्स फॉर आरे’चे समन्वयक साहिल पार्सेकर आणि ‘पुरोगामी विद्यार्थी संघटने’च्या अध्यक्षा साम्या कोरडे यांनी केले. दरम्यान, संपूर्ण मुंबईत तरुणांचा या विषयाकडे कल जास्त असून तरुणांची निसर्गाप्रती असलेली भावना निदर्शनास येत आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

मेट्रो कारशेडसाठी आरे येथील २६४६ झाडे तोडण्याचा निर्णय मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने घेतला आहे. या निर्णयावर मुंबईकरांनी आणि पर्यावरण प्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. ते या निर्णयाला विरोध करत आहेत. मात्र, आरेतील कारशेडशिवाय मेट्रो प्रकल्प होणे अशक्य असल्याचे मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिक अश्विनी भिडे यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, महापालिकेच्या निर्णयाच्या विरोधात विविध लोकांकडून टीका करण्यात येत आहे. सिनेतारकांपासून ते सामाजिक कार्यकर्त्यांनी या निर्णयाला विरोध केला आहे. आरे जंगल हा मुंबईचा श्वास आहे. आरेमधील झाडांवर कुऱ्हाड चालवली तर मुंबईत प्रदुषण वाढेल, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांची आहे.

आरे हे जंगल मुंबईचा श्वास आहे, ते वाचविण्यासाठी सर्वच मुंबईकरांनी प्रयत्न करायला हवा. मेट्रो प्रकल्पाला आमचा विरोध नाही, पण आरेमधील झाडे न तोडता काहीतरी तोडगा निघायला हवा. कारशेडची जागा बदलवून हे निश्चित साध्य होईल, असे आमचे मत आहे. आरे वाचले तरच मुंबई वाचेल हे लक्षात घेऊन सर्वच विद्यार्थ्यांनी आरे वाचवा या स्वाक्षरी मोहिमेत सहभागी व्हावे.
-साहिल पार्सेकर (समन्वयक, स्टुडंन्ट्स फॉर आरे)

हेही वाचा – आरेतील कारशेडविना ‘मेट्रो-३’ अशक्य – अश्विनी भिडे

आरे मधील २७०० झाडे तोडणे हा पुढच्या पिढीसाठी खूप मोठा धोका आहे. हे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना या प्रश्नासाठी समोर जावे लागेल. विद्यार्थ्यांनी, तरुणांनी एकत्र येऊन आवाज उठविण्याशिवाय पर्याय उरलेला दिसत नसून सर्वांनीच आरे वाचवा या स्वाक्षरी मोहीमेत सहभाग नोंदवावा. सरकारनेही लवकरच यावर निर्णय घेऊन आरे मधील कारशेडची जागा बदलावी.
-साम्या कोरडे (अध्यक्षा, पुरोगामी विद्यार्थी संघटना)
First Published on: September 19, 2019 5:01 PM
Exit mobile version