पाचवी, आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली!

पाचवी, आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली!

कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता २३ मे रोजी घेण्यात येणारी पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात आला आहे. येत्या काळात कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील तारीख जाहीर करण्यात येईल, असे राज्य परीक्षा परिषदेकडून सांगण्यात आले आहे. देशात आलेल्या दुसर्‍या कोरोनाच्या लाटेमुळे पहिली ते दहावीच्या परीक्षा रद्द करण्याबरोबरच जेईई, नीट, सीए, सीएससारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मात्र शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यासंदर्भात राज्य परीक्षा परिषद ठाम असल्याने सरकारकडून सहा लाख मुलांचा जीव धोक्यात घालण्यात येत आहे. यासंदर्भात ‘आपलं महानगर’मध्ये २८ एप्रिलला ‘दहावी परीक्षा रद्द, पदवी परीक्षा ऑनलाईन मात्र शिष्यवृत्ती परीक्षा ऑफलाईन होणार!’ या शीर्षकाखाली बातमी प्रसिद्ध केली होती. त्यानंतरही शिष्यवृत्ती परीक्षेसंदर्भात सातत्याने पाठपुरावा घेण्यात येत होता.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शिष्यवृत्तीची परीक्षा रद्द करण्याची मागणी पालक व शिक्षकांकडून होत होती. याची दखल घेत राज्य परीक्षा परिषदेकडून शालेय शिक्षण व क्रीडा विभागाला परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भात ५ मे रोजी पत्र पाठवले. या पत्रामध्ये परिषदेने विद्यार्थ्यांनी वर्षभर परीक्षेची तयारी केली आहे. परीक्षा रद्द केल्यास विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर प्रतिकूल परिणाम होईल, शिवाय गुणवत्ता यादीत येण्याची त्यांची संधी कायमस्वरुपी डावलली जाईल.

परीक्षेची संपूर्ण तयारी परीक्षा परिषदेकडून झाली असून, १५ मेपर्यंत परीक्षेचे सर्व साहित्य जिल्हा केंद्रावर पोहोचवण्यात येईल. त्यामुळे परीक्षा रद्द करण्याऐवजी ती पुढे ढकलण्यात यावी, अशी विनंती राज्य परीक्षा परिषदेकडून शिक्षण विभागाला केली होती. त्याअनुषंगाने २३ मे रोजी होणारी शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी दिली. भविष्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन परीक्षेची पुढील तारीख जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचे (इयत्ता आठवी) आयोजन २३ मे रोजी करण्यात आले होते. या परीक्षेमधून पाचवीच्या १६ हजार ६९३ एवढ्या विद्यार्थ्यांना आठवीपर्यंत आणि आठवीच्या १६ हजार ५८८ विद्यार्थ्यांना दहावीपर्यंत दरमहा शिष्यवृत्ती देण्यात येते. दरवर्षी फेब्रुवारीमध्ये घेण्यात येणारी ही परीक्षा कोविडच्या प्रादुर्भावामुळे २५ एप्रिल व त्यानंतर २३ मे रोजी घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. या परीक्षेला सुमारे ६ लाख ३० हजार विद्यार्थी बसले आहेत.

परीक्षेला बसणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या

               मुले            मुली         एकूण          परीक्षा केंद्र
पाचवी      १८३६९२     २०४६४३      ३८८३३५         ३३९४
आठवी     १०६४५०     १३७६९३       २४४१४३         २२९३

First Published on: May 7, 2021 8:08 PM
Exit mobile version