मनसेच्या दणक्यानंतर शाळा प्रशासन वठणीवर; वाढीव शुल्क न घेण्याचा निर्णय

मनसेच्या दणक्यानंतर शाळा प्रशासन वठणीवर; वाढीव शुल्क न घेण्याचा निर्णय

कोरोनामध्ये शाळांनी शुल्क वाढवू नये या शासन निर्णयाला अनेक शाळांकडून केराची टोपली दाखवल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. यासंदर्भात पालकांनी तक्रारी करूनही शाळा प्रशासन आपल्या निर्णयावर ठाम आहे. शिक्षण विभागाने निर्णय धुडकावून लावत सांताक्रुझमधील पानबाई इंटरनॅशनल स्कूलने वाढीव शुल्क न भरणार्‍या तब्बल १८० विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण बंद केले. या शाळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मंगळवारी दणका दिल्यानंतर शाळा व्यवस्थापनाने माघार घेत विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वर्ग पुन्हा सुरू झाले.

सांताक्रुझमधील पानबाई इंटरनॅशनल स्कूलने यंदा शुल्कामध्ये १५ टक्के वाढ केली. मात्र कोरोनामुळे अनेक पालकांचे व्यवयाय ठप्प झाले असून, काहींच्या नोकर्‍या गेल्या आहेत. त्यामुळे शुल्कवाढ भरणे त्यांना शक्य नव्हते. यासंदर्भात पालकांनी शाळा व्यवस्थापनाला शुल्कवाढ करू नये तसेच अनावश्यक असलेले शुल्कही घेण्यात येऊ नये अशी विनंती केली. ट्यूशन फी आणि टर्म फी भरण्याची तयारी पालकांनी दाखवली. मात्र शाळा व्यवस्थापनाने ही विनंती धुडकावून लावत शुल्कवाढ लागू केली. तसेच शालेय शुल्क न भरल्याने तब्बल १८० विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षणही बंद केले. विद्यार्थ्यांचे शिक्षण बंद केल्याने हतबल झालेल्या पालकांनी अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे धाव घेतली. मनसे महापालिका कर्मचारी कामगार सेनेचे चिटणीस अखिल चित्रे यांनी तातडीने मंगळवारी शाळा व्यवस्थापनासोबत बैठक घेत शाळा प्रशासनाला दणका दिला. यावेळी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. या बैठकीत पालकांनी शाळेकडून आकारण्यात येणारे विविध शुल्क रद्द करण्याची विनंती करत ट्यूशन फी आणि टर्म फी भरण्याची तयारी दर्शवली. मनसेच्या दणक्यानंतर शाळेने एक पाऊल मागे घेत पालकांची विनंती मान्य केली. तसेच १८० विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण तातडीने सुरू केले. त्याचप्रमाणे शुल्कामध्ये देण्यात येणारी सवलत शुक्रवारी जाहीर करण्यात येईल असे जाहीर केले, अशी माहिती अखिल चित्रे यांनी दिली.

First Published on: December 30, 2020 7:34 PM
Exit mobile version