शाळेला सुट्टी पडली पण खेळायचं कुठे?

शाळेला सुट्टी पडली पण खेळायचं कुठे?

शाळांच्या परीक्षा संपून सर्व लहानग्यांना सुट्ट्या लागल्या आहेत. मात्र, खेळण्यासाठी असलेल्या उद्यानावर अतिक्रमण झाल्याने आता खेळायचे कुठे? असा प्रश्न चिमुकल्यांना पडला आहे. नौपाडा परिसरातील भास्कर कॉलनीजवळील एकमेव जिजाऊ बालोद्यानावर आधीच अतिक्रमण झाले आहे. त्यातच आता कंत्राटदाराने उद्यानात आपले सामान ठेवल्याने उद्यान खेळण्यासाठी आहे का गोदामासाठी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

या उद्यानाची अवस्था मागील तीन ते चार वर्षांपासून अत्यंत बिकट आहे. अत्रे कट्टा-अभिनय कट्टा ते एमएसईबी सबस्टेशन असा भला मोठा परिसर या उद्यानाचा होता. या दोन सांस्कृतिक कट्टे आणि सबस्टेशनने उद्यानाच्या परिसरावर अतिक्रमण केले. उद्यानाचा अर्ध्याहून अधिक भाग यांनी व्यापला, त्यातच ठामपाचा हजेरी शेड आणि एका देवालयाचेही अतिक्रमण झाले. त्यामुळे उद्यानात लहानग्यांना खेळण्यासाठी खूपच कमी जागा उरली होती. त्यामुळे छोट्या जागेतच खेळणी बसवण्यात आली. त्यातच या ठिकाणी ओव्हरब्रीजचे काम सुरू झाले आणि संबंधित ठेकेदाराने या उद्यानात आपले सामान आणून ठेवले. मागील एक ते दीड वर्षांपासून कंत्राटदाराकडून या उद्यानाच्या जागेचा वापर सुरू आहे. त्यामुळे उद्यानाची शोभा गेली असून, उद्यानात माती पसरली आहे. लहान मुलांचे झोके, घसरगुंडी आदी खेळण्यांची दुरवस्था झाली आहे.

या बागेत खेळायला जागाच उरली नाही. याबाबत स्थानिक नगरसेवकांना माहिती दिली. निवडणुकीच्या आचारसंहिते आधीच आम्ही याबाबत प्रशासनालाही कळवले. आता मात्र निवडणुका झाल्यानंतर डागडुजी करू, असे आश्वासन दिले जात आहे.
– मनिष वाघ, स्थानिक नागरिक

First Published on: April 24, 2019 4:14 AM
Exit mobile version