Mumbai schools : मुंबईतील सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालये मार्चपासून पूर्ण वेळ, पूर्ण क्षमतेने सुरू होणार

Mumbai schools : मुंबईतील सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालये मार्चपासून पूर्ण वेळ, पूर्ण क्षमतेने सुरू होणार

मुंबई :  मुंबईत कोविडची तिसरी लाट नियंत्रणात आल्याने मुंबईतील सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालये मार्चपासून पूर्ण वेळ व पूर्ण क्षमतेने मात्र कोविडबाबतचे सर्व नियमांचे पालन करून सुरू करण्याचे आदेश राज्य शासन व मुंबई महापालिका आयुक्त, शिक्षण विभागाने दिले आहेत. यासंदर्भातील एक परिपत्रक पालिका शिक्षण अधिकारी राजेश कंकाळ व शिक्षण अधिकारी (प्रभारी) राजू तडवी यांनी शुक्रवारी रात्री उशिराने जारी केले आहे. त्यामुळे आता पालिका, सरकारी, खासगी आणि सर्व माध्यमाच्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालयात आता मार्च महिन्यापासून पूर्ण क्षमतेने विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी दिसणार आहेत.

मुंबईत गेल्या मार्च २०२० पासून थैमान घालणाऱ्या कोविडच्या पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या लाटेमुळे पालिका, खासगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालये मध्यंतरी अधूनमधून बंद करावी लागली होती. मात्र आता कोविडची तिसरी लाट आरोग्य यंत्रणेच्या नियंत्रणात आल्याने राज्य शासन व मुंबई महापालिका प्रशासन यांनी मुंबईतील सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालये पूर्ण वेळ आणि पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयात पर्यटन मंत्री व मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांची पालिका आयुक्त इकबाल चहल यांच्यात महत्वपूर्ण बैठक पार पडली. त्यानंतर कोविड नियमांचे काटेकोरपणे पालन करून शाळा, कनिष्ठ महाविद्यालये सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. या बैठकीला, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, सहआयुक्त अजित कुंभार, चंद्रशेखर चौरे, शिक्षण अधिकारी आदी उपस्थित होते. या शाळा, कनिष्ठ महाविद्यालये सुरू करताना विद्यार्थ्यांसाठी शालेय बस, खासगी बस सेवा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

कोविडची तिसऱ्या लाटेचा जोर असताना सर्व शाळा, महाविद्यालये आतापर्यंत ५० टक्के प्रत्यक्ष आणि ५० टक्के ऑनलाइन पद्धतीने चालविण्यात येत होत्या. आता या सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालये पूर्ण वेळ व पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहेत.
मात्र पर्यटन मंत्री व पालकमंत्री आदित्य ठाकरे व पालिका आयुक्त इकबाल सिंह यांनी मार्चपासून शाळा सुरू करताना कोविड नियमांचे काटेकोर पालन करणे अनिर्वाय असल्याचे स्पष्ट केले आहे.

पालिकेने याबाबत जारी केलेल्या परिपत्रकानुसार, विशेष, दिव्यांग विद्यार्थ्यांना शाळेत, कनिष्ठ महाविद्यालयात जात येणार आहे. तसेच,सर्व शाळा, मैदानी खेळ, शाळेचे विविध उपक्रमासह पूर्णवेळ आणि पूर्ण क्षमतेने शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांसाठी काही नियम

  1. शाळा, कनिष्ठ महाविद्यालयात सर्व विद्यार्थ्यांचे तापमान प्रवेशद्वारातच तपासले जाईल.

2.  शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १०० टक्के लसीकरण व उपस्थिती अनिवार्य असणार आहे.

3. शाळा, कनिष्ठ महाविद्यालयात, नियमित वर्गांच्या तासांमध्ये मैदानी खेळ, शालेय कवायती, सहशालेय शैक्षणिक उपक्रम सुरू करण्यास परवानगी असणार आहे.

4. शालेय बस/ व्हॅनमध्ये कोविड नियमांचे पालन करून विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यास परवानगी असणार आहे.

5. शाळांमध्ये पूर्वीप्रमाणे मधली सुट्टी असेल व विद्यार्थ्यांना आहार घेता येणार आहे.

6. मात्र विद्यार्थ्यांना खोकला, सर्दी, ताप आदी लक्षणे असल्यास पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवू नये.

7.  कोविड लसीकरणासाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना लसीचे डोस देण्यासाठी पालकांच्या संमतीनुसार निर्णय घेण्यात येईल. पालिका शिक्षण विभाग आणि डॉक्टरांच्या सहाय्याने शाळांच्या आवारात १५ वर्षांवरील विद्यार्थ्यांसाठी लसीकरण शिबिरे आयोजित करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे.


 

First Published on: February 25, 2022 9:54 PM
Exit mobile version