सौंदर्यीकरणाच्या नावाखाली काढलेले दुभाजक ‘त्या’ महिलेच्या मृत्यूला कारणीभूत; जयंत पाटलांचा रोख कोणाकडे?

सौंदर्यीकरणाच्या नावाखाली काढलेले दुभाजक ‘त्या’ महिलेच्या मृत्यूला कारणीभूत; जयंत पाटलांचा रोख कोणाकडे?

मुंबईः वरळी सी लिंकवर एका धावपटू महिलेचा कारच्या धडकेत मृत्यू झाला. सुशोभीकरणाच्या नावाखाली मुंबईची तोडफोड करण्याचे काम सुरु आहे. सी लिंकवरचे दुभाजक काढले. तेथील सर्व काढून टाकले आहे. तेथे आता काहीच नाही. त्या ठिकाणी त्या धावपटू महिलेचा मृत्यू झाला, याकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभेचे लक्ष वेधले.

जयंत पाटील म्हणाले, सध्या मुंबईच्या सुशोभीकरणाचे काम मोठ्या प्रमाणात सुरु आहे. मुंबई आमच्या ताब्यात आल्यानंतर आम्ही काय करु शकतो हे दाखवण्याचे काम भाजप करत आहेत. त्यासाठी मुंबईची तोडफोड सुरु आहे. त्याची काही आवश्यकता नाही. कोस्टल रोड झाल्यानंतर तेथे जागा उपलब्ध होणार आहे. त्या ठिकाणी सुशोभीकरण होऊ शकते, असा सल्ला जयंत पाटील यांनी दिला.

वरळी सी लिंकवर रविवारी झालेल्या अपघातात धावपटू महिलेचा मृत्यू झाला. ही धावपटू महिला लंडन मॅरेथॉनची तयारी करत होती. सकाळी साडेसहा वाजता याचाच सराव करत असताना त्या महिलेला एका कारने चिरडले. त्यात तिचा मृत्यू झाला. राजलक्ष्मी विजय, असे या धावपटू महिलेचे नाव आहे. त्या अल्टिस्ट टेक्नॉलॉजिस या टेक फर्मच्या सीईओ होत्या. २०२३ च्या टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये त्या सहभागी झाल्या होत्या. राजलक्ष्मी या फिटनेस जागरुक होत्या. त्या जॉगर्स फोरमचा भागही होत्या. लंडनमध्ये मॅरेथॉन होणार आहे. त्याचा सराव त्या करत होत्या. रविवारी त्या पतीसोबत मॅरेथॉनचा सराव करत होत्या. त्या सी लिंकवर होत्या. त्यावेळी एक भरधाव ईलेक्ट्रीक कारने त्यांना चिरडले. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.

पोलिसांनी इलेक्ट्रीक कार चालकाला अटक केली आहे. समर मर्चंट असे या कार चालकाचे नाव आहे. निष्काळजीपणे वाहन चालवणे, मृत्यूस कारणीभूत ठरणे या कलमांतर्गत मर्चंट विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेच्या दिवशी तो दारु प्यायला होता, असे तपासात समोर आले आहे. मात्र जयंत पाटील यांनी विधानसभेत दिलेल्या माहितीचा रोख नेमका कोणाकडे आहे याची चर्चा सुरु झाली आहे.

 

First Published on: March 21, 2023 7:18 PM
Exit mobile version