बाजारात बनावट बँडेजची विक्री

बाजारात बनावट बँडेजची विक्री

Bandage

महाराष्ट्रात पुरवल्या जाणार्‍या बनावट बँडेजमुळे कॅन्सर होण्याची शक्यता बळावली आहे. राज्यात दुसर्‍या शहरांमधून बनावट बँडेज विकले जात असल्याची बाब एका संघटनेकडून उघड झाली आहे. यामुळे रुग्णांचे आरोग्य धोक्यात आहे, कारण यातून बँडेज वापरणार्‍या रुग्णाला कॅन्सर होण्याची शक्यता आहे.

एका न्यायालयीन निवाड्यातून तामिळनाडू राज्यात अवैद्यकीय (नॉन मेडिकल) बँडेज तयार केले जात आहे. हे बँडेज पूर्णतः अवैद्यकीय आहे. हे बँडेज औषधाप्रमाणे वापरू शकत नाही. तामिळनाडूच्या व्यापार्‍यांनी सर्वोच्च न्यायालयाकडून या बँडेजवर नॉनमेडिकल असा शिक्कामोर्तब करून घेतला आहे. त्यामुळे या बँडेज निर्मितीवर कोणत्याही सरकारी विभागाचे बंधन नसते, पण हे बँडेज महाराष्ट्रात आणून रुग्णसेवेसाठी वापरात आणले जात असल्याची तक्रार या संघटनेने केली आहे. कोणतेही बँडेज निर्माण करताना त्यावर ब्लिच केले जाते, पण वैद्यकीय सेवेतील बँडेजला वापरण्यात येणार्‍या ब्लिचचे प्रमाण हे निकषांवर आधारित आहे. इतर बँडेजला ब्लिच कोणत्याही प्रमाणात वापरतात. वैद्यकीय सेवेत वापरण्यात येणार्‍या बँडेजचे वितरण करताना त्यावर पॅकेजिंग तारखा आणि अन्य माहिती उपलब्ध करणे आवश्यक आहे, पण नॉन मेडिकल बँडेजच्या आवरणावर कोणतीही माहिती उपलब्ध नसते, पण नेमके हेच बँडेज महाराष्ट्रात छोट्या छोट्या दवाखान्यांमधून विकले जात असून, रुग्णसेवेत वापरले जात आहे.

तामिळनाडूतील बनावट बँडेजमध्ये मोठ्या प्रमाणात ब्लीच वापरले जात असल्याने हे ब्लिच जखमेतून शरीरात गेल्यास कॅन्सरची लागण होऊ शकते, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ही बाब ऑल फूड अ‍ॅण्ड ड्रग लायसन्स होल्डर फाऊंडेशनने केंद्रीय आरोग्य विभागाच्या लक्षात आणून दिली आहे.

First Published on: April 11, 2019 4:00 AM
Exit mobile version