कळसकरच्या ताब्यासंदर्भातील सीबीआयचा अर्ज न्यायालयाने फेटाळला

कळसकरच्या ताब्यासंदर्भातील सीबीआयचा अर्ज न्यायालयाने फेटाळला

शरद कळसकर

नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणाताली आरोपी शरद कळसकरचा ताबा मिळावा यासाठी सीबीआयने सत्र न्यायालयात दाखल केलेला अर्ज फेटाळून लावला आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणाच्या चौकशीसाठी शरद कळसकरचा ताबा मिळावा असा अर्ज सीबीआयने सत्र न्यायालयात केला होता. न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावल्यामुळे सीबीआयला मोठा धक्का बसला आहे. सीबीआयचा अर्ज कायदेशीरदृष्ट्या योग्य नसल्याचे सांगितल न्यायालयाने सीबीआयच्या कार्यपध्दतीवर नाराजी व्यक्त केली आहे.

सीबीआयचा अर्ज न्यायालयाने फेटाळला

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी शरद कळसकर एटीएसच्या ताब्यात आहे. तर याच प्रकरणातला दुसरा आरोपी सचिन अंदुरे सीबीआयच्या ताब्यात आहे. सीबीआयला या दोन्ही आरोपींची समोरासमोर बसून चौकशी करायची आहे. त्यामुळे कळसरचा ताबा मिळावा अशी मागणी सीबीआयने मंगळवारी झालेल्या सुनावणी दरम्यान केली होती. यासाठी सीबीायने सत्र न्यायालयात अर्ज देखील केला होता. मात्र आज कोर्टाने हा अर्ज फेटाळून लावला.

दोन्ही आरोपींची समोरासमोर चौकशी करायची आहे

आरोपी सचिन अंदुरेची पोलीस कोठडी ३० ऑगस्टला संपत असून त्याला उद्या न्यायालयीन कोठडी मिळणार आहे. त्यामुळे शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांची सीबीआयला समोरासमोर चौकशी करता येणार नाही असे सीबीआयने न्यायालयासमोर सांगितले. तसंच दाभोलकर हत्या प्रकरणाच्या तपासासाठी कळसकरचा ताबा मिळणे आवाश्यक असल्याचे देखील सीबीआयने सांगितले.

पोलीस कोठडी संपल्यावर ताब्याची मागणी करा

मात्र एखादा आरोपी एखाद्या तपास यंत्रणेच्या पोलीस कोठडीत असताना त्याला दुसऱ्या यंत्रणेच्या पोलीस कोठडीत देण्यात यावा याला कायदेशीर आधार आहे का असा सवाल न्यायालयाने सीबीआयला केला. न्यायालयाच्या सवालाला सीबीआयने काहीच उत्तर दिले नाही. सीबीआयने फक्त दोन दिवस कळसकरचा ताबा मागितला होता. मात्र न्यायालयाने ताबा देण्यास नकार दिला. ३ सप्टेंबरला जेव्हा पुन्हा कळसकरची पोलीस कोठडी संपेल तेव्हा सीबीआय कोठडीची मागणी करा असे सांगत सत्र न्यायालयाने सीबीआयचा अर्ज फेटाळला आहे.

First Published on: August 29, 2018 6:22 PM
Exit mobile version