शहिदांच्या नावाने सैनिक वन उभारणार

शहिदांच्या नावाने सैनिक वन उभारणार

Martyr jawan

ग्रामीण, दुर्गम भागातील आदिवासी बांधव आणि पर्यावरणासाठी कार्यरत असणार्‍या विवेकच्या पर्यावरण समितीकडून 42 झाडांना पुलवामातील शहीद जवानांची नावे देऊन सैनिक वन उभारून त्यांना अनोखी श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे.मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील भालीवली गावात विवेक पर्यावरण समितीचे कार्य गेली 6 वर्षांपासून सुरू आहे. दुर्गम भागातील शिक्षणापासून वंचित राहिलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत ज्ञानदानाचे कार्य या समितीकडून केले जात आहे.या विद्यार्थ्यांना घरापासून शाळेत आणि शाळेतून घरी पोहोचण्याच्या व्यवस्थेसह मोफत गणवेश, शालेय वस्तू, जेवण पुरवले जात आहे. या कार्याबरोबरच विवेकने येथील डोंगरावर शेकडो झाडांची लागवड केली आहे.

या झाडांसाठी दत्तक योजना सुरू करण्यात आली असून, पर्यावरणप्रेमींनी झाडे दत्तक घेतली आहेत. त्यात पोलीस,सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी, पत्रकारांचाही समावेश आहे. गेल्या वर्षी 7 जुलैला याच डोंगरावर रोपे लावण्यात आली होती. या रोपांना आता 42 शहीद जवानांची नावे देण्यात येणार आहेत, तसेच त्यावर त्यांच्या बटालियनची आणि वैयक्तिक माहिती देण्यात येणार आहे. या वनाला सैनिक वन नावे देण्यात येऊन त्यांत शहीद सैनिकांच्या नावाने झाडे लावण्यात येणार आहेत. या वनात भारतीय सैनिकांच्या शौर्याची गाथा नागरिकांना वाचायला मिळणार आहे. त्यात आवश्यकतेनुसार आणि आलेल्या सुचनांननुसार बदलही करण्यात येणार असल्याचे समितीकडून सांगण्यात आले.

First Published on: February 19, 2019 4:37 AM
Exit mobile version