सेतू केंद्र नोंदणीचे पैसे परत करणार

सेतू केंद्र नोंदणीचे पैसे परत करणार

इंजिनियरिंग, फार्मासी, आर्किटेक्चर या अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा पार पाडण्यासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) राज्यभरात तालुकास्तरावर सेतू केंद्र उभारले होते. सेतू केंद्रावर सुविधा पुरवण्यासाठी नेमलेल्या एजन्सींना विद्यार्थ्यांकडून 40 रुपये घेऊन त्यांना प्रवेश प्रक्रियेबाबत सुविधा पुरवणे बंधनकारक होते. जवळपास 2.5 ते 3 लाख विद्यार्थ्यांनी सेतू केंद्रांवर नोंदणी केली. परंतु सर्व्हरमधील तांत्रिक बिघाडामुळे प्रवेश परीक्षा रद्द झाल्याने एजन्सीने विद्यार्थ्यांकडून घेतलेले 40 रुपये त्यांच्याकडून परत घेण्याचा निर्णय सीईटी सेल घेणार आहे.

सीईटी सेलकडून मेमध्ये राज्यभरातून इंजिनियरिंग, फार्मासी, आर्किटेक्चर व अ‍ॅग्रीकल्चर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेण्यात आली. सीईटी परीक्षेला राज्यभरातून जवळपास 3 लाख 93 हजार विद्यार्थी बसले होते. प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यावर विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी राज्यभरात तालुकास्तरावर तब्बल 390 सेतू केंद्र सुरू करण्यात आले होते. या सेतू केंद्रांवर विद्यार्थ्यांना कागदपत्रांची पडताळणी करणे, कागदपत्र सादर करणे, प्रवेश अर्ज निश्चित करणे, ऑनलाईन प्रवेश शुल्क भरणे अशा सुविधा पुरवण्यात येणार होत्या. जेणेकरून विद्यार्थ्यांना कॉलेज किंवा संस्थांमध्ये हेलपाटे मारावे लागणार नाहीत व शहरी भागातील विद्यार्थ्यांसह ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पार पाडणे सुलभ होईल. सेतू केंद्रावर विद्यार्थ्यांना सुविधा पुरवण्यासाठी व ऑनलाईन प्रवेश परीक्षा राबवण्यासाठी सीईटी सेलकडून खासगी एजन्सीची नेमणूक केली होती.

सेतू केंद्रावरील सुविधेसाठी विद्यार्थ्यांना 42 रुपये भरून नोंदणी करणे आवश्यक होते. त्यानुसार जवळपास 2.5 ते 3 लाख विद्यार्थ्यांनी सेतू केंद्रांवर नोंदणी केली. परंतु मागील आठवड्यात प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतर पहिल्या दिवसापासूनच निर्माण झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे विद्यार्थी हैराण झाले होते. सर्व्हरमधील तांत्रिक बिघाड सलग चार दिवस कायम राहिल्याने विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल झाले. सर्व्हर डाऊन झाल्याने विद्यार्थ्यांचे होणारे हाल लक्षात घेऊन सीईटी सेलकडून प्रवेश प्रक्रिया स्थगित करण्यात आली. प्रवेश प्रक्रिया रद्द केल्याने आम्ही भरलेल्या 42 रुपयांचे काय, असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून विचारण्यात येऊ लागला. त्यामुळे एजन्सींनी सेवा पुरवण्यासाठी विद्यार्थ्यांकडून घेतलेले 40 रुपये परत घेण्याचा निर्णय सीईटी सेलने घेतला आहे.

सेवा देण्यासंदर्भात एजन्सीने घेतलेले 42 रुपये परत घेण्याचा निर्णय सीईटी सेलने घेतला आहे. हे पैसे विद्यार्थ्यांना परत देण्याबाबतचा प्रस्ताव प्राधिकरणासमोर ठेवण्यात येणार आहे. प्राधिकरणाच्या बैठकीतच याबाबत निर्णय घेण्यात येईल.
– डॉ. माणिक गुरसाळ, आयुक्त, सीईटी सेल

First Published on: June 27, 2019 4:46 AM
Exit mobile version