शहाड ते टिटवाळावासीयांचे आरोग्य धोक्यात

शहाड ते टिटवाळावासीयांचे आरोग्य धोक्यात

नागरी शौचालयाची सेफ्टी टँक साफ करण्यासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या ‘अ’ प्रभागात एकच मैलागाडी साफ करण्यासाठी असून या गाडीची अवस्थाही भंगार झाली आहे. हीच गाडी मागील पंचवीस वर्षांपासून या कामासाठी वापरत असल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या मोहने, अंबिवली येथील ‘अ’ प्रभागात, शहाड ते टिटवाळा असा प्रभाग येत असून एकूण दहा प्रभाग येथे अस्तित्वात आहेत. पूर्वी लोकसंख्या अत्यंत अल्प असतानाही प्रभागात एकच मैलागाडी कार्यरत होती, परंतु आता प्रभाग वाढून आणि नागरी लोकसंख्या दहापट होऊनही एकच मैलागाडी असून ती देखील कमालीची जुनी, नादुरुस्त आहे.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने ज्यावेळेस मैलावाहन गाडीची कल्याण आरटीओकडून पासिंग करून घेतली होती. तिला किमान पंचवीस वर्षांचा कालावधी झाला आहे. ही गाडी जुनी झाल्याने नेहमी पालिकेच्या गॅरेज विभागात दुरुस्तीसाठी न्यावी लागत आहे.

कल्याण आरटीओने अशा वाहनांना कधीच भंगारात काढण्याचा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी मात्र येथे होताना दिसत नाही. भंगारात जात असणारी गाडी अद्यापही आरटीओच्या आशीर्वादाने कल्याण-डोंबिवली महापालिकेत कार्यरत आहे. प्रभागात किमान दोन ते तीन लाख नागरिक वास्तव्यास असून या प्रभागातील नागरिकांकरता किमान सुस्थितीत असणारी मैलागाडी पालिका प्रशासन देता येत नसेल तर, त्यांना नागरिकांकडून इतर टॅक्स घेण्याचा अधिकार नसल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

First Published on: November 11, 2019 1:24 AM
Exit mobile version