बदल्यांच्या भानगडीत पडू नका

बदल्यांच्या भानगडीत पडू नका

भाजप हा प्रबळ विरोधी पक्ष असून त्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे कोणतीही चुकीची गोष्ट करू नका, प्रलोभनांपासून दूर रहा, बदल्यांच्या भानगडीत पडू नका, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे सर्व मंत्री आणि राज्यमंत्र्यांना दिला असल्याचे समजते.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर आज यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. सुमारे तीन तास चाललेल्या या बैठकीत मंत्र्यांनी काय करावे आणि काय करू नये यावर शरद पवार यांनी मार्गदर्शन केले.

प्रशासकीय यंत्रणा, मंत्रालयीन कामकाज आणि पक्षवाढी संदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली. पालक मंत्रिपदाची यादी जाहीर झाल्यानंतर आपआपल्या जिल्ह्यात सर्व पालकमंत्र्यांनी काय काय काम केले पाहिजे, हे मंत्र्यांना सांगण्यात आले. काम करताना अडकवण्यासाठी सापळाही रचला जाऊ शकतो. त्यासाठी कोणत्याही गोष्टींना भुलू नका, प्रलोभनांपासून लांब रहा, अडचणी उद्भवल्यास अनुभवी आणि वरिष्ठ मंत्र्यांशी चर्चा करा, असा सल्लाही शरद पवार यांनी दिला आहे. सत्तेत आल्यामुळे लोकांची कामे करा. आणखी दहा वर्षे सत्ता कशी टिकेल या दृष्टीने विचार करा.पक्षाची आणि स्वत:ची प्रतिमा जपा. जनतेची जास्तीत जास्त कामे करण्यासाठी महाराष्ट्र विकास आघाडीतील दोन्ही मित्र पक्षांशी समन्वय साधण्याबाबतही शरद पवार यांनी या बैठकीत मार्गदर्शन केले.

First Published on: January 9, 2020 5:25 AM
Exit mobile version