नव्या कृषी कायद्यांना होणारा विरोध पाहता केंद्राने अजुनही शहाणपणा दाखवावा – शरद पवार

नव्या कृषी कायद्यांना होणारा विरोध पाहता केंद्राने अजुनही शहाणपणा दाखवावा – शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

नव्या कृषी कायद्याला होणारा विरोध आणि मंगळवारी दिल्ली उफाळलेला हिंसााचार पाहता अजुनही केंद्राने शहाणपणा दाखवावा, शेतकरी आंदोलनातील या सगळ्या घटकांशी बोलताना एकदम टोकाची भूमिका सोडावी आणि रास्त मागण्यांचा गांभीर्याचा विचार करावा. केंद्राने या संपुर्ण विषयात आत्मचिंतन करत लवकरच अनुकुल निर्णय घ्यावा. बळाचा वापर करून जी भूमिका केंद्राने घेतलेली आहे ती योग्य नसल्याचे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलकांकडून उसळलेल्या हिंसाचार हा राजकीय डाव नसून शेतकऱ्यांचा उद्रेकच आहे. गेल्या ५५ दिवसांपासून संयमाने सुरू असणारे आंदोलनात आज निघालेल्या ट्रॅक्टर रॅलीला योग्य पद्धतीने हाताळण्याची जबाबदारी सरकारची होती. पण ट्रॅक्टर रॅलीला प्रतिकार झाल्यामुळेच या आंदोलनाला वेगळ वळण लागले. ही परिस्थिती योग्यरीत्या हाताळता आली असती, पण तसे झाले नाही. त्याचेच रूपांतर पुढे हे हिंसाचारात झाले. शेतकरी आंदोलकांनी कायदा हातात घेणे ही बाब योग्य नाही. पण ही वेळ शेतकऱ्यांवर का आली ? याचाही विचार होणे गरजेचे असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.

देशात पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांना नजरअंदाज करून चालणार नाही. या राज्यांचा देशाच्या सुरक्षेसाठी आणि अन्नधान्य पुरवठ्यात योगदान आहे. म्हणूनच ही राज्ये महत्वाची आहेत. देशावर जी संकटे आली त्या प्रत्येकवेळी पंजाब आघाडीवर होता. पंजाब अस्वस्थ पाहिला आहे, पुन्हा पंजाब अस्वस्थेतेकडे नेऊ नये. शेतकरी आंदोलनामध्ये ज्या मागण्या शेतकऱ्यांकडून होत आहेत त्यावर तोडगा काढण्यासाठी सकारात्मक अशी चर्चा होणे गरजेचे आहे. ज्या मागण्या शेतकऱ्यांकडून होत आहेत, त्या मागण्यांपैकी रास्त मागण्यांवर विचार करणे केंद्राकडून अपेक्षित आहे. शेतकऱ्यांसोबतचा संवाद न तुटता चर्चा होणे गरजेचे आहे. केंद्राकडून जी कृषी विधेयके आणली गेली ती रेटून नेण्याचा प्रकार योग्य नाही. खर तर या विधेयकांवर आधी चर्चा होणे गरजेचे होते. दिल्लीतला हिंसाचार रोखता आला असता. पण त्यासाठी वेळीच शेतकऱ्यांना सहकार्य करणे गरजेचे होते. आता येत्या दिवसांमध्ये त्याठिकाणी शांतता प्रस्थापित झाल्यानंतर एकत्रित विचार करण्याची जेव्हा संधी मिळेल तेव्हा नक्कीच या विषयामध्ये तोडगा काढण्यासाठीचा विचार करू असे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील आंदोलनाचे कौतुक

मुंबईत आझाद मैदानात झालेल्या शेतकरी आंदोलनामध्ये राज्य सरकारने संयमाची भूमिका घेतली. आंदोलक आणि सरकार यांच्यात सामंजस्याची भूमिका असल्यानेच हे शेतकरी आंदोलन महाराष्ट्रात यशस्वी झाले. मुंबईसारख्या शहरात आझाद मैदानात आंदोलक हे अतिशय शिस्तीने वागले. मुंबईत ही परिस्थिती अनेक राजकीय पक्ष असतानाही अतिशय संयमाने हाताळली गेली यासाठी त्यांनी राज्य सरकारचे कौतुक केले. तसाच संयम केंद्राने दाखवणे गरजेचे आहे. पण बळाचा वापर करून आपण आंदोलन संपवू शकतो हा समज असेल तर तो चुकीचा आहे असे पवार म्हणाले.

विरोधी पक्षनेता पदाचे अवमूल्यन

मुंबईत भेंडी बाजारातून आंदोलक आले असा आरोप जर राज्याच्या विधान परिषदेचे विरोध पक्षनेते करत असतील तर ते महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. मीदेखील त्या पदावर काम केले आहे. अशा प्रकारचे बेजबाबदार वक्तव्य करणे म्हणजे त्या पदाच अवमूल्यन असल्याचे मत पवारांनी व्यक्त केले.

First Published on: January 26, 2021 5:55 PM
Exit mobile version