कल्याणमध्ये उमेदवाराची शोधाशोध; शरद पवार व्हर्च्युअल संवाद साधणार

कल्याणमध्ये उमेदवाराची शोधाशोध; शरद पवार व्हर्च्युअल संवाद साधणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

कल्याण लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचा कोण उमेदवार असेल याबाबत दररोज नवनवीन नावे समोर येत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवारांबाबत संभ्रम आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे बुधवार १३ मार्चला व्हिडीओ कॉन्सफरन्सिंगच्या माध्यमातून कल्याणच्या कार्यकत्यांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे कार्यकत्यांच्या मनातील उमेदवार कोण असेल हे जाणून घेण्याचा प्रयत्नही पवार हे करण्याची शक्यता आहे.

शरद पवार साधणार संवाद

कल्याण नेतीवली मेट्रो जंक्शन मॉल येथील दुस-या मजल्यावरील हॉलमध्ये पदाधिकारी आणि कार्यकत्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास पवार हे व्हिडीओ कॉन्सफरन्सद्वारे सर्व कार्यकत्यांशी थेट संवाद साधून त्यांची मते जाणून घेणार आहेत. तसेच लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कशी तयारी केली पाहिजे याचेही मार्गदर्शन करणार आहेत. कल्याण लोकसभा मतदार संघ क्षेत्रात एकूण सहा विधानसभा मतदार संघाचा समावेश येतो. त्यामुळे डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ आणि मुंब्रा कळवा या परिसरातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

यांच्या नावाची जोरदार चर्चा

कल्याण लोकसभा हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणूनच ओळखला जातो. शिवसेनेचे नेते व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र श्रीकांत शिंदे हे खासदार आहेत. त्यामुळे शिवसेनेकडून शिंदे पून्हा मैदानात उतरणार आहेत. माजी खासदार आनंद परांजपे हे कल्याणमधून लढण्यास इच्छूक नसल्याने त्यांचे नाव ठाण्यासाठी घेतले जात आहे. कल्याण लोकसभेसाठी पक्षाकडून गणेश नाईक, जितेंद्र आव्हाड यांची नावे सुरूवातीला चर्चेत आली होती. मात्र शिंदे यांच्या विरोधात लढण्यास नाईक आणि आव्हाड हे इच्छूक नसल्याचे समजते. त्यामुळे लोकसभेच्या मैदानातून त्यांची नावे मागे पडली आहेत. ठाण्याचे नगरसेवक बाबाजी पाटील यांचे नाव दोन दिवसांपासून पून्हा चर्चेत आले आहे.

उद्या शिक्कामोर्तब होईल

दरम्यान, पक्षाकडून माजी सिडको चेअरमन प्रमोद हिंदुराव, प्रदेश प्रवक्ते महेश तपासे, आमदार आप्पा शिंदे, वंडार पाटील, रमेश हनुमंते, बाबाजी पाटील आदी इच्छूक असल्याचे समजते. राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार कोण असेल याबाबत अजून कोणताच निर्णय झालेला नाही. त्यामुळे बुधवारच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे शरद पवार हे कार्यकत्यांचे मत आजमावण्याची शक्यता आहे. त्यानंतरच कल्याणचा उमेदवार कोण असेल याबावर शिक्कामोर्तब होईल असे एका पदाधिका-याने सांगितले.

First Published on: March 12, 2019 10:34 PM
Exit mobile version