शिवसेनेची मुख्यमंत्री हटाव मोहीम

शिवसेनेची मुख्यमंत्री हटाव मोहीम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (फाईल )

राज्यात सुरू झालेल्या मराठा आंदोलनाआडून मुख्यमंत्री हटवण्याची जोरदार मोहीम सुरू झाली आहे.सत्तेतील सहकारी पक्ष असलेल्या शिवसेनेसह दोन्ही काँग्रेस पक्षांनी या मोहिमेत उडी घेतली आहे. मराठा आंदोलनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच जबाबदार असल्याचा थेट आरोप त्यांनी केला आहे. या तिन्ही पक्षांचा मुख्यमंत्री फडणवीसांवर रोष आहे. त्यामुळेच त्यांना हटवण्यासाठी हे पक्ष सज्ज झाले होते. मराठा आरक्षणाचे आंदोलन हे मुख्यमंत्र्यांविरोधात विरोधकांना मिळालेले कोलित आहे. या आंदोलनाने मुख्यमंत्र्यांविरोधातील आग अधिकच भडकली आहे.

आरक्षणाच्या मुख्य मागणीसाठी मराठा आरक्षण कृती समितीने केलेल्या आवाहनानंतर राज्यात सकल मराठा आंदोलन सुरू झाले आहे. आरक्षणाचा निर्णय घेण्यात राज्यातल्या आघाडी सरकारने चालढकल केल्याचा आक्षेप घेत आंदोलकांनी पंढरपुरातील शासकीय विठ्ठलपूजेचा मान घेण्यास मुख्यमंत्र्यांना ठाम विरोध दर्शवला. लाखोंच्या संख्येने येणार्‍या भाविकांच्या सुरक्षेची चिंता वाहत मुख्यमंत्र्यांनी आपला निर्णय बदलला. मात्र हे करताना त्यांनी आंदोलकांबाबत आक्षेपार्ह टिपण्णी केली. यामुळे संतप्त झालेल्या मराठा समाजाने आंदोलनाची तीव्रता वाढवली. या आंदोलनाने मुख्यमंत्री फडणवीस यांना टार्गेट केले आहे. तेच या आंदोलनाला कारणीभूत असल्याचे आंदोलकांबरोबरच विरोधी पक्षांचे नेते सांगू लागले आहेत.

राज्यात सत्ता राबवताना मुख्यमंत्री सेनेला विश्वासात घेत नसल्याने या पक्षाचा मुख्यमंत्र्यांवर सुरुवातीपासूनच रोष आहे. या रोषातून अनेकदा शिवसेनेचे मुख्यमंत्र्यांशी खटकेही उडाले होते. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सेनेचे ज्येष्ठ खासदार विनायक राऊत आणि अरविंद सावंत यांनी आंदोलनाला मुख्यमंत्रीच कारणीभूत असल्याचा थेट आरोप केला होता. बुधवारी मुंबई बंदच्या दरम्यान सेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री बदलाची शक्यता वर्तवली. हे सांगताना भाजपमध्येच यासाठी उठाव होऊ लागल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले. या तिन्ही खासदारांच्या वक्तव्यांचा बोलवता धनी पक्ष प्रमुख उध्दव हेच असल्याचे उघडपणे बोलले जात आहे. यावरून शिवसेना मुख्यमंत्र्यांविरोधी किती आग्रही आहे, हे लक्षात यायला वेळ लागत नाही.

एकीकडे मुख्यमंत्री विरोधातील सेनेची मोहीम अशी जोर धरत असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही या मोहिमेत पध्दतशीर उडी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात थेट भूमिका घेत आंदोलनाला तेच जबाबदार असल्याचे जाहीर करून टाकले. पक्षाच्या इतर नेत्यांनीही मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका करत आंदोलनात जोश भरण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रात काँग्रेसला नामोहरम करण्यात मुख्यमंत्री फडणवीस हेच आघाडीवर असतात. राज्यात काँग्रेसच्या झालेल्या दारुण अवस्थेला फडणवीसांचे धोरण कारण असल्याने मुख्यमंत्री त्या पक्षाचे पहिले टार्गेट आहेत. दोन्ही काँग्रेस पक्षाच्या आघाडीत खोडा घालण्यातही मुख्यमंत्र्यांचा पुढाकार असल्याने दोन्ही काँग्रेस पक्षांचा मुख्यमंत्र्यांना हटवणे हा एकमेव कार्यक्रम झाला आहे. मराठा आंदोलनाने त्यांच्या मोहिमेला साथ दिली आहे.

फडणवीस एकाकी !

दरम्यान, मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पक्षात एकाकी पडल्याचे चित्र कालपर्यंत होते. आंदोलनाची घोषणा झाल्यापासून मुख्यमंत्री एकटेच यावर बोलत होते. पंढरपूर येथील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार्‍या पूजेला विरोध करण्याची आंदोलकांकडून घोषणा झाल्यावरही पक्षाचा एकही नेता बोलला नाही. केवळ मुख्यमंत्र्यांनीच त्यावर वक्तव्य करत स्वत:ची अडचण करून घेतली. मुंबई बंदच्या दरम्यानही आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांविरोधी थेट आरोप करूनही भाजपच्या एकाही नेत्याने त्यांची बाजू घेतली नाही. सेनेने मुख्यमंत्री बदलाचे संकेत दिले. तेव्हाही भाजपने मौन साधले. आंदोलन हाताबाहेर जातोय, असे लक्षात आल्यावर ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तेवढी मुख्यमंत्र्यांची बाजू घेतली. हे सगळे पक्षातच मुख्यमंत्री एकाकी पडल्याचे चित्र होते.

First Published on: July 26, 2018 5:00 AM
Exit mobile version