शिवसेनेच्या आमदारांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट

शिवसेनेच्या आमदारांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट

अजोय मेहता

शिवसेनेच्या मुंबईतील सर्व आमदार आणि पालिकेच्या नगरसेवकांनी महानगरपालिका आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेतली. विधानसभेमध्ये ५०० आणि ७०० चौ. फूटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शिवसेनेच्या आमदारांनी मागणी केली असता, मुख्यमंत्र्यांनी ५०० आणि ७०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार पालिका आयुक्तांनी आतापर्यंत हा प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठवणे आवश्यक होते.

मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव पाठवण्याची मागणी 

मात्र हा प्रस्ताव आर्थिक दायित्वाशी निगडीत असल्यामुळे महानगरपालिका प्रशासनाचे प्रमुख, महानगरपालिका आयुक्त या नात्याने ही जवाबदारी पूर्ण केली नसल्याने करदात्याना अद्याप लाभ मिळत नसल्याने शिवसेना आमदार आणि नगरसेवकानी हा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नगरविकासाकडे पाठवावा, अशी मागणी केली आहे.

मुबंईतील करदात्यांचा भार कमी व्हावा

मालमत्ता कर रद्द करावा याकरता सन २०१७ च्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये शिवसेना पक्षाने ५०० चौ. फूटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याचे तसेच ५०० ते ७०० चौ. फूटाच्या घरांना मालमत्ता करामध्ये सवलत देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार पालिका सभागृहामध्ये ६ जुलै २०१७ रोजी ठराव क्र. ३२६ मंजूर झालेला असून मुबंईतील महापौरांच्या स्वाक्षरीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले होते. विधानसभेमध्येही ५०० आणि ७०० चौ. फूटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्यासंदर्भात शिवसेनेच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे वारंवार लक्ष वेधले होते. यानंतर मालमत्ता कर माफ करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिले होते.

First Published on: August 6, 2018 6:06 PM
Exit mobile version