आश्रय योजनेचे प्रस्ताव मंजूर होताना भाजप नगरसेवक गप्प का होते ? – शिवसेना

आश्रय योजनेचे प्रस्ताव मंजूर होताना भाजप नगरसेवक गप्प का होते ? –  शिवसेना

मुंबईतील सफाई कामगारांना ‘आश्रय’ योजनेतून घर देण्यासाठी २०१८ पासून तब्बल १२ प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. आता या योजनेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करणारे भाजपचे नगरसेवक प्रस्ताव मंजूर होत असताना गप्पा का होते ? असा सवाल करीत स्थायी समिती अध्यक्ष व शिवसेना उपनेते यशवंत जाधव यांनी, भाजपने केलेले आरोप फेटाळून लावले आहेत.

पालिकेतील सफाई कामगारांना घरे मिळवून देण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू आहे. त्यामुळे शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरात ३०० ते ६०० चौरस फुटांची हजारो घरे बांधली जाणार आहेत. याबाबतचे प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत २०१८ पासून मंजूरही झाले आहेत. मात्र त्यावेळी स्थायी समितीत हे प्रस्ताव मांडले जात असताना व मंजूर होताना भाजपचे नगरसेवक मूग गिळून गप्प का बसले होते, असा सवाल स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केला आहे.

वास्तविक, आश्रय योजना आणि श्रम साफल्य योजना या दोन्ही योजना वेगळ्या आहेत. मात्र त्या एकत्र करून ‘आश्रय’ योजनेत १८४४ कोटींचा भ्रष्टाचार झाल्याबाबत भाजपाने केलेला आरोप हा चुकीचा व बिनबुडाचा आरोप आहे, असा दावा यशवंत जाधव यांनी केला आहे.

भाजपचे आमदार मिहीर कोटेचा व पालिका गटनेते प्रभाकर शिंदे यांनी, शनिवारी भाजप प्रदेश कार्यालयात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत, पालिका सफाई कामागरांच्या घरांसाठी राबविण्यात येत असलेल्या योजनेत १८४४ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप शिवसेनेवर केला होता. त्याला स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी चोख उत्तर देत भाजपचे आरोप फेटाळून लावले आहेत.

भाजपाचे १५ ते २० नगरसवेक संपर्कात, दिवाळीत धमाका – यशवंत जाधव

मुंबई महापालिकेतील भाजपाच्या नेतृत्वावर त्यांचे अनेक नगरसेवक नाराज आहेत. अशा नाराज नगरसेवकांपैकी १५ ते २० नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत. येत्या महापालिका निवडणुकीपूर्वी डिसेंबर महिन्यात याबाबत धमाका करू, असा गौप्यस्फोट शिवसेनेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केला आहे.

महापालिकेत भाजपाकडे सत्ता व पदे नसल्याने भाजपचे अनेक नगरसेवक त्रस्त झाले आहेत. तसेच, पालिकेतील भाजप नेत्यांच्या मनमानी कारभाराला त्यांचे नगरसेवक कंटाळले आहेत. त्यामुळेच, भाजपचे अनेक नगरसेवक हे विचलीत झाले आहेत. भाजपचे काही नेते प्रसिद्धीपोटी एकीकडे शिवसेनेवर उठसुठ बेछूट आरोप करीत असताना भाजपमधील त्रस्त असलेले १५ ते २० नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत. येत्या डिसेंबर महिन्यात याबाबतचा धमाका करू, असा गौप्यस्फोट यशवंत जाधव यांनी केला आहे.


हेही वाचा – सफाई कामगारांच्या मागण्या सोडविण्यासाठी संयुक्त समिती स्थापन करा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

First Published on: October 18, 2021 8:45 PM
Exit mobile version