शिवसेना ठाकरे गट तीन नंबरचा पक्ष; पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्याने ‘मविआ’त बिघाडी?

शिवसेना ठाकरे गट तीन नंबरचा पक्ष; पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्याने ‘मविआ’त बिघाडी?

पृथ्वीराज चव्हाण

मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधान केले की, राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसचा मोठा भाऊ आहे. या विधानावर बोलताना ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (pruthviraj chavan) यांनी शिवसेनेचा ठाकरे गट तीन नंबरचा पक्ष म्हटले आहे. त्यामुळे आगामी काळात राज्यात विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये जागा वाटपांवरून महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होणार का? हे पाहावे लागेल.

महाविकास आघाडीमध्ये सध्या जागावाटपाची चर्चा सुरू असल्याचे म्हटले जाते. याचपार्श्वभूमीवर कोल्हापूरमध्ये 20 मे रोजी बोलतांना अजित पवार म्हणाले की, महाविकास आघाडी मजबूत ठेवण्याचं काम आपल्याला करायचे आहे. आपली जास्त ताकद असेल तरच तुम्हाला महाविकास आघाडीमध्ये महत्त्व दिले जाईल. यापूर्वी काँग्रेसला जागा मिळायच्या आणि आम्हाला लहान भावाची भूमिका घ्यावी लागायची. मात्र, आता आम्ही काँग्रेसचा मोठा भाऊ झालो आहोत, असे म्हणत त्यांनी काँग्रेसच्या 44 जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 54 जागा असल्याचे गणित मांडले.

अजित पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, आपल्या पक्षाच्या वाढीकरता प्रत्येक पक्षाचे नेते उत्साहवर्धक वक्तव्य करत असतात. सद्यस्थिती पाहता आजच्या महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हा मोठा पक्ष आहे. काँग्रेस दोन नंबर, तर शिवसेना उद्धव ठाकरे गट तीन नंबरचा पक्ष आहे. त्यामुळे विधान करण्यात काही चुकीचे नाही. पण अशा वक्तव्यांना फारसं महत्त्व नाही. पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढविण्यासाठी अशी वक्तव्य करण्यात येतात, असा टोला पृथ्वीराज चव्हाण यांनी अजित पवार यांना लगावला.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनीसुद्धा महाविकास आघाडी तुटू नये, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे. दोन दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी लोकसभेच्या ४८ जागांपैकी महाविकास आघाडी सर्व जागा लढवेल आणि त्यातल्या १९ जागा तेव्हाच्या शिवसेनेच्या होत्या, तेवढ्या जागा आमच्या कायम राहतील, असे वक्तव्य केले होते. त्यामुळे महाविकास आघाडीच्या ज्येष्ठ नेत्यांकडून आपल्या सोबत असलेल्या पक्षांवर एक प्रकारचा दबाव पाडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येते. त्यामुळे आगामी काळात राज्यात विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये जास्त जागा कोण लढवणार हे पाहावे लागेल.

First Published on: May 22, 2023 5:54 PM
Exit mobile version