शिवसेनेचं अयोध्येतलं शक्तिप्रदर्शन 2.0

शिवसेनेचं अयोध्येतलं शक्तिप्रदर्शन 2.0

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या गडबडीत ‘चलो अयोध्या’चा नारा दिलेल्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा ७ मार्चचा रामजन्मभूमी दौरा मागल्या खेपेपेक्षा जोरदार करण्यासाठी ठाण्याच्या शिवसेनेने कंबर कसली आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या टीमने ठाण्यापासून अयोध्येपर्यंत जय्यत तयारी सुरु केली आहे. मागच्या खेपेला पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आपल्या १८ खासदारांना घेऊन अय्योध्येत जाऊन श्रीरामाचे दर्शन घेतले होते. यावेळी उध्दव ठाकरे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान असल्याने यावेळी शिवसेना जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहे.


हेही वाचा – तुम्ही दिल्लीत गेलात तर सगळ्यात जास्त आनंद सुधीर मुनगंटीवार यांना होईल – अजित पवार


दरम्यान, शक्तिप्रदर्शनचा महत्वाचा भार उचलणाणाऱ्या ठाण्याच्या शिवसेनेने २००० कार्यकर्त्यांसाठी एका विशेष रेल्वेचे आरक्षण केले आहे. मागच्या वेळेस १८ बोगींची रेल्वे आरक्षित केलेल्या ठाणेकरांनी या वेळेस २१ बोगींची विशेष गाडी आरक्षित केली आहे. त्यासाठी ५७ लाख रुपये भरुन आरक्षण करण्यात आले आहे. तर किमान १०० हून अधिक पदाधिकारी विमानाने प्रवास करणार आहेत. या कार्यकर्त्यांना दिल्लीतून खास रेल्वे उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी खासदार राजन विचारे यांनी पार पाडली आहे. तर निवास व्यवस्थेवर लक्ष ठेवून कुणाची गैरसोय होऊ नये तसेच निवास व्यवस्था आणि वातावरण निर्मिती यासाठी सचिन जोशी यांना अयोध्येत पाठवून भव्यतेची खबरदारी घेण्याच्या सूचना एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. राज्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या बरोबर सत्तेत असली तरी शिवसेनेने हिंदुत्व दूर लोटलेले नाही हा संदेश देण्यासाठी ‘श्रीराम’ असे लिहीलेली सुमारे पाच हजार गमजे बनवून घेण्यात आले आहेत. तसेच शिवसेनेचे धनुष्यबाण ही निशाणी असलेले झेंडे तातडीने बनवून अयोध्येत पाठवण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे लखनौ ते अयोध्या या मार्गावर मोठमोठे होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सुरक्षेसाठी ही शिवसेना नेत्यांनी पोलीसांबरोबरच आपले ‘खास’ कार्यकर्ते अयोध्येत नेले आहेत. एकनाथ शिंदे ही जबाबदारी शिवसेना नेते संजय राऊत आणि मिलींद नार्वेकर यांच्याशी समन्वय साधून पूर्णत्वाला नेण्यासाठी प्रयत्नरत आहेत. मात्र, लोकसभा आणि विधानसभा अधिवेशनामुळे सेनानेत्यांची धावपळ उडाली आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, आमदार रविंद्र फाटक, महापौर नरेश म्हस्के, माजी महापौर मिनाक्षी शिंदे, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांच्या टीमवर स्वत: एकनाथ शिंदे जातीने लक्ष ठेवून आहेत. उध्दव ठाकरे यांच्या ७ तारखेच्या अयोध्या दौऱ्याकडे राज्यासह दिल्लीचंही लक्ष लागलेलं आहे.अश्या परिस्थितीत कोणतीही कमतरता राहू नये तसेच त्याचवेळी शिवसेनेत ठाण्याच्या गटाचा प्रभाव अधोरेखित व्हावा यासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आपलं कसब पणाला लावले आहे.

 

First Published on: March 4, 2020 10:10 PM
Exit mobile version