पुढचे ६ महिने शिवभोजन थाळी ५ रुपयातच मिळणार; राज्य सरकारचा निर्णय!

पुढचे ६ महिने शिवभोजन थाळी ५ रुपयातच मिळणार; राज्य सरकारचा निर्णय!

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सुरू केलेल्या अल्प दरातल्या शिवभोजन थाळीचा दर अजूनच कमी करून ५ रुपयांपर्यंत कमी केला होता. मात्र, आता अजून ६ महिने शिवभोजन थाळीचे दर कमीच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. राज्यात महाविकासआघाडीचं सरकार सत्तेत आल्यानंतर शिवसेनेच्या जाहीरनाम्यामध्ये समाविष्ट असलेली शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली होती. फक्त १० रुपयांमध्ये संपूर्ण जेवण यामध्ये दिलं जात होतं. मात्र, कोरोनाचं संकट ओढवल्यानंतर मार्च महिन्यात हा १० रुपयांचा दर देखील कमी करून ५ रुपये करण्यात आला होता. तीन महिन्यांसाठी हा दर ठरवण्यात आला होता. त्याला २ जुलै रोजी पुन्हा ३ महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. आता हीच मुदत १ ऑक्टोबरपासून पुढचे ६ महिने म्हणजेच पुढच्या वर्षी मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे.

शिवभोजन थाळीची योजना राज्य सरकार सत्तेत आल्यापासून सुरू करण्यात आली आहे. यामध्ये शहरी भागात प्रतिथाळी ४५ रुपये तर ग्रामीण भागात प्रतिथाळी ३० रुपये सरकारकडून अनुदान स्वरूपात दिले जातात. यासाठी राज्य सरकारकडून १६० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

मंत्रिमंडळ बैठकीतले इतर महत्त्वाचे निर्णय!

  1. मुदत संपलेल्या व कोरोना विषाणु संक्रमणामुळे निवडणूका न झालेल्या नागरी स्थानिक संस्थांमध्ये नियुक्त प्रशासकांचा कालावधी वाढविणार. अध्यादेश काढण्यास मान्यता
  2. राज्यातील सर्व माजी सैनिक व त्यांच्या घरपट्टी व मालमत्ता कर माफ करण्यासाठी मा बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजना
  3. धारावी पुनर्विकास प्रकल्पाची सध्या सुरू असलेली निविदा प्रक्रिया रद्द. नव्याने निविदा मागविणार
  4. मुंबई शहरातील जीर्ण व मोडकळीस आलेल्या उपकार इमारतींच्या जलद पुनर्विकासकरिता नव्याने मार्गदर्शक सूचना जाहीर
  5. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखालील विद्युत शाखेचे बळकटीकरण करणार
  6. राज्यातील रायगड जिल्ह्यात प्रस्तावित बल्क ड्रग पार्क व औरंगाबाद ऑरिक सिटी येथे वैद्यकीय उपकरण पार्क प्रकल्पाकरिता विशेष प्रोत्साहने देण्यास मान्यता
First Published on: October 29, 2020 4:46 PM
Exit mobile version