महाराष्ट्रात महाआरती,आज उद्धव ठाकरेंचा शिवनेरी दौरा

महाराष्ट्रात महाआरती,आज उद्धव ठाकरेंचा शिवनेरी दौरा

Ayodhya rammandir

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्या दौरा आखून राममंदिराच्या मुद्याला हवा दिली आहे. त्यासाठी मागील दोन आठवड्यांपासून सुरू असलेली तयारी आता अंतिम टप्प्यावर आली आहे. हळूहळू उद्धव ठाकरे यांचा अयोध्या येथील कार्यक्रमही निश्चित होऊ लागला आहे. पक्षनेतृत्त्वाच्या आदेशानुसार उद्धव ठाकरे ज्या दिवशी शरयू नदीकडे महाआरती करणार आहेत, त्याच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र शिवसैनिकांकडून महाआरतींचे आयोजन करण्यात येणार आहे. मुंबईत सिद्धीविनायक मंदिराही प्रचंड मोठ्या प्रमाणात महाआरतीचे आयोजन होणार आहे. तत्पूर्वी गुरुवारी, उद्धव ठाकरे छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ शिवनेरी येथे जाऊन तेथील माती अयोध्याला नेणार आहेत.

मागील तीन दशकांपासूनचा भाजपचा राम मंदिराचा मुद्दा हायजॅक करून देशभरात भाजपपेक्षा कट्टर हिंदुत्ववादी पक्ष म्हणून स्वतःची प्रतिमा निर्माण करण्याचा शिवसेनेचा हा प्रयत्न अधिकाधिक तीव्र होऊ लागला आहे. दोन दिवसांपासून टप्प्याटप्याने महाराष्ट्रातून शिवसैनिक अयोध्याकडे रवाना होऊ लागले आहेत. शिवसेनेच्या या अयोध्या कार्यक्रमाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईतून एका विशेष रेल्वेने मोठ्या संख्येने वारकरी टाळ मृदुंगाचा गजर करत अयोध्येला रवानाही झाले आहेत. दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या अयोध्येतील सभेला पोलिसांनी परवानगी नाकारल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. परंतु, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मात्र या पुष्टी दिली नाही. शिवसेनेने सभेसाठी अशी कुठलीही परवानगी मागितली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र अयोध्या काही पाकिस्तानात नाही, त्यामुळे सभेला परवानगी कशाला मागायाची, असा मुद्दा उपस्थित करत राऊत यांनी याबाबत संभ्रमाचे वातावरण कायम ठेवले आहे.

महाराष्ट्रातही होणार शक्तीप्रदर्शन

शिवसेना एका बाजुला अयोध्येत हिंदुत्वासंबंधी वातावरण निर्माण करतांना त्याच वेळी महाराष्ट्रातही शक्तीप्रदर्शन करणार आहे. त्यानुसार उद्धव ठाकरे अयोध्येत शरयू नदीवर महाआरती करणार आहेत. त्याच वेळी मुंबई, ठाण्यासह राज्यभर शिवसैनिका मंदिरांमध्ये महाआरतीचे आयोजन करणार आहेत. त्यासाठी युवासेना आणि महिला आघाडीला जवाबदारी देण्यात आली आहे. राज तिलक की करो तयारी आ रहे है भगवा धारी,गर्वसे कहो हम हिंदू है,सौगंध राम की खाते है मंदिर वही बनायेंगे, श्री रामचंद्र की जय, भारत माता की जय अशा घोषणांचा गजर करत शिवसैनिक आणि सर्व नागरिकांनी या सामूहिक आरतीत सहभागी होण्याचे आदेश पक्षनेतृत्त्वाकडून देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे मुंबईतील श्री सिद्धीविनायक मंदिरातही मोठ्या प्रमाणात महाआरतीचे आयोजन करून मुंबई शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे. याठिकाणच्या महाआरतीकडे पक्षनेतृत्त्वाचे विशेष लक्ष असणार आहे.

शिवनेरीचा माती अयोध्ये नेणार

नियोजित अयोध्या दौर्‍यापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे गुरुवारी, २२ नोव्हेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ किल्ले शिवनेरीवर जाणार आहेत. तेथील माती एका कलशात भरून ती अयोध्येतील राम जन्मभूमीतील महंताना देणार आहेत. शिवनेरी किल्ल्यावरील माती राम जन्मभूमीत मंदिर निर्माणासाठी वापरण्यात येणार आहे. अशा प्रकारे छत्रपती के आशीर्वाद चलो मोदी के साथ या भाजपच्या घोषणेला शिवनेरी किल्यावरील माती रामजन्मभूमीत नेवून उद्धव ठाकरे भाजपला आव्हान देणार आहेत.

First Published on: November 22, 2018 5:33 AM
Exit mobile version