मुख्यमंत्रीपदाबाबत योग्यवेळी निर्णय – शिवसेना वर्धापनदिनी मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच!

मुख्यमंत्रीपदाबाबत योग्यवेळी निर्णय – शिवसेना वर्धापनदिनी मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच!

मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास

मंगळवारी १९ जून रोजी शिवसेनेचा ५३वा वर्धापन दिन मुंबईतल्या षण्मुखानंद सभागृहात पार पडला. यावेळी शिवसेनेच्या सर्व दिग्गज नेत्यांसह नवनिर्वाचित खासदार आणि शिवसेना कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली. यावेळी सर्वात चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे मुख्यमंत्र्यांची या सोहळ्याला उपस्थिती. त्यावर अनेक चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. शेवटी मुख्यमंत्र्यांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली. आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांनी या चर्चांना उत्तर दिलं. ‘माझ्या वर्धापन दिनाला येण्यावरून अनेक लोकांच्या मनात प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले. या कार्यक्रमाला मी आलो बाळासाहेबांचे आशिर्वाद, उद्धवजींचं प्रेम आणि शिवसैनिकांची ऊर्जा घेण्यासाठी आलोय’, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

‘हल्ली सगळीकडे मुख्यमंत्री कोण होणार? याची चर्चा सुरू असते. मला वाटतं, माध्यमांमध्ये अशा रोज चर्चा सुरू असतात. पण शिवसेना कार्यकर्त्यांनी बाळासाहेब ठाकरेंनी महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करायचं स्वप्न जे पाहिलेलं आहे, ते पूर्ण करण्याचं ध्येय समोर ठेवायला हवं. त्यामुळे कोण मुख्यमंत्री होईल, यावर चर्चा न करता निवडणुकांवर लक्ष ठेवायला हवं. सर्व गोष्टी मी आणि उद्धवजींनी ठरवले आहेत. योग्य वेळी योग्य गोष्टी सांगितल्या जातील’, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

‘शिवसेना-भाजपला लोकसभा निवडणुकांमध्ये मिळालेल्या यशाचे खरे शिल्पकार हे शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आहेत. मला शिवसेनेच्या कोणत्याही कार्यक्रमाला येताना आपल्या घरी येत असल्यासारखं वाटतं. कारण आपण दोघेही भगव्यासाठी काम करणारे आहोत’, असं देखील मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

First Published on: June 19, 2019 8:25 PM
Exit mobile version