विधानसभेवर भगवा फडकवणारच! उद्धव ठाकरेंचा निर्धार!

विधानसभेवर भगवा फडकवणारच! उद्धव ठाकरेंचा निर्धार!

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

अमित शाहा यांची भेट, कर्नाटक निवडणुकांमध्ये भाजपाची झालेली नाचक्की आणि जम्मू-काश्मीरमध्ये भाजपाने सत्तेतून बाहेर पडण्याचा घेतलेला निर्णय, या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे वर्धापन दिन सोहळ्यामध्ये काय घोषणा करणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. शिवाय सकाळीच शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केलेल्या दिलेल्या स्वबळाच्या नाऱ्यामुळे उद्धव ठाकरेंच्या भूमिकेविषयी चर्चा सुरू झाली होती. अखेर, वर्धापन दिनाच्या भाषणावेळी ‘पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल, विधानसभेवर भगवा फडकावणारच’ असे सांगत उद्धव ठाकरेंनी स्वबळाचे संकेत दिले.

…मोदी मंगळावर रवाना!

यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजप आणि विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुरेपूर तोंडसुख घेतलं. ‘मोदींच्या घरावर उडती तबकडी आढळल्याची बातमी ऐकली. काही दिवसांनी मोदी मंगळावर रवाना अशीच बातमी येईल’ असा टोला ठाकरेंनी यावेळी लगावला. ‘पृथ्वीवर बघण्यासारखं काहीच राहिलेलं नाही. त्यामुळे थोड्याफार थापा तिकडे मारून बघू’, अश शब्दांत उद्धव ठाकरेंनी मोदींच्या परदेश दौऱ्यांची खिल्ली उडवली.

‘फूट पाडण्यासाठी पवारांचं पगडी राजकारण’

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही उद्धव ठाकरेंनी यावेळी टीका केली. मराठी माणसांमध्ये फूट पाडण्यासाठीच शरद पवारांनी पगडीचं राजकारण केल्याचं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. ज्या टिळकांनी सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? असे ब्रिटिशांना ठणकावून सांगितले, त्या टिळकांची पगडी तुम्हाला का नको? असा सवालही त्यांनी यावेळी विचारला. तसेच, ‘मराठी माणसांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न कराल, तर जनता तुम्हाला गाडून टाकेल’ असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

बांगलादेशी हिंदूंच्या प्रवेशाला विरोध

बांगलादेशातल्या हिंदूंना आसाममध्ये प्रवेश देण्यासंदर्भात केंद्र सरकार विधेयक आणण्याचा विचार करत आहे. मात्र केंद्राच्या या भूमिकेला उद्धव ठाकरेंनी कडाडून विरोध केला आहे. सरकार बांगलादेशातल्या हिंदूंना आसाममध्ये प्रवेश देणार असेल, तर भारतातील हिंदूंना काश्मीरमध्ये प्रवेश का नाही मिळू शकत? काश्मीरमध्ये जमिनी का नाही विकत घेता येऊ शकत? असा सवाल त्यांनी केला आहे. हे विधेयक संसदेत आलं, तर शिवसेनेचे खासदार त्याला विरोध करतील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

…तीन वर्ष का लागले?

मंगळवारी दुपारीच भाजपाने जम्मू-काश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्ती यांच्या सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याची घोषणा केली. मात्र, ‘मुफ्ती सरकार नालायक आहे हे कळायला ३ वर्ष का जावी लागली? ६०० जवान शहीद झाल्यानंतर भाजप सरकारला शहाणपण आलं का?’ असा थेट सवाल उद्धव ठाकरेंनी केला. तसेच, दहशतवाद्यांना जर धर्म नसतो, तर रमजानमध्येच शस्त्रसंधी का केली? असा प्रश्नही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

First Published on: June 19, 2018 6:16 PM
Exit mobile version