‘मुंबई मा जलेबी ने फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’; मुंबई जिंकण्यासाठी सेनेची गुजराती मतदारांना साद

‘मुंबई मा जलेबी ने फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’; मुंबई जिंकण्यासाठी सेनेची गुजराती मतदारांना साद

मुंबई महानगर पालिकेची निवडणूक पुढेली वर्षी २०२२ मध्ये होणार असून त्यासाठी आतापासून सर्व राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. भाजपसोबत युती तुटल्याने यावेळी शिवसेनेसमोर मुंबई जिंकण्याचं मोठं आव्हान असणार आहे. शिवाय, महाविकास आघाडीतील काँग्रेसने मुंबई महापालिकेसाठी एकला चलो रे नारा दिल्याने शिवसेनेला संघर्ष करावा लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता शिवसेनेने आतापासूनच मुंबई महापालिका जिंकण्यासाठी प्रयत्न सुरु केले असून अमराठी मतदारांना विशेषत: गुजराती मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोहिम सुरु केली आहे. ‘मुंबई मा जलेबी ने फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ असं म्हणत शिवसेनेने १० जानेवारीला जोगेश्वरी येथे गुजराती बांधावांचा खास मेळावा आयोजित केला आहे.

शिवसेनेने भाजपसोबतची युती तोडत काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केल्याने भाजप दुखावला गेला आहे. शिवसेनेमुळे मोठा पक्ष असूनही सरकार स्थापन करु न शकल्यामुळे भाजप नाराज आहे. त्यामुळे भाजपने शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या मुंबई महानगर पालिकेवर एकहाती सत्ता मिळवण्यासाठी कंबर कसली आहे. दरम्यान, काँग्रेस महापालिकेच्या निवडणुकीत स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असल्यामुळे भाजपला याचा फायदा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेला यावेळी पालिकेच्या निवडणुकीत संघर्ष करावा लागणार आहे. त्यामुळे शिवसेनेने आता पासूनच तयारी सुरु केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर ‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ मोहीम सुरु करण्यात आली आहे. शिवसेनेकडून गुजरातींसाठी मेळावा आयोजित केला आहे. शिवसेना संघटक हेमराज शाह यांच्यावर गुजराती मतदारांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

दरम्यान, याआधी शिवसेनेने विधानसभा निवडणुकीच्या वेळी आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघातून उभे राहिले होते. त्यावेळी गुजराती मतदारांना आकर्षित करण्यासाठी ‘केम छो वरळी’ असं म्हणत गुजराती बांधवांना साद घातली होती. शिवसेनेच्या या भूमिकेवर विरोधकांनी टीका केली होती. मात्र, निवडणुकीत शिवसेनेला याचा फायदा झाला होता. आता पालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने भाजपला शह देण्यासाठी पुन्हा गुजराती कार्ड बाहेर काढलं आहे.

 

First Published on: January 5, 2021 11:37 AM
Exit mobile version