भाईंदर महापालिकेच्या भाजी मार्केटमध्ये विना परवाना शूटिंग

भाईंदर महापालिकेच्या भाजी मार्केटमध्ये विना परवाना शूटिंग

भाईंदर महापालिकेच्या रामदेव पार्क येथील भाजी मार्केटमध्ये बेकायदेशीरपणे शूटिंग केले जात असल्याने खरेदीसाठी येत असलेल्या रहिवाशांची गैरसोय होत आहे.

मीरा भाईंदर महापालिकेच्या हद्दीत रामदेव पार्क परिसरातील भाजी मार्केटमध्ये गुरुवारपासून विना परवानगी शूटिंग सुुरु करण्यात आल्याने रहिवाशांची गैरसोय होऊ लागली आहे. महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता ठेकेदाराने परस्पर चित्रीकरण करण्याकरता भाजी मार्केट दिल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे.

महापालिकेने हा बाजार भाजपा पदाधिकारी मधुसूदन पुरोहित यांना देखभालीसाठी दिला आहे. त्यांनी या बाजारात आर्थिक तडजोडीतून फेरीवाल्यांचा भरणा केल्याचा आरोप त्यांच्यावर होत असतानाच त्यांनीच या बाजारात महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता गुरुवारी शूटिंगसाठी भाड्याने दिल्याचे समोर आले आहे. गुरुवारी भाजीमार्केटमध्ये सुरु असणार्‍या चित्रिकरणाची तक्रार नीलेश शाहु सहित अनेकांनी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 4 कार्यालयात केल्यानंतर महापालिकेच्या मार्फत घटनास्थळी येऊन पाहणी करणार्‍या अधिकारी, कर्मचारी यांनी बघ्याची भूमिका घेतली. ठेकेदाराने शहरातील भाजी मार्केट बनवण्याकरता स्वतःचे पैसे लावले आहेत. त्यामुळे त्याला काहीही करण्याचे हक्क आहे, असे सांगत अधिकार्‍यांनी तक्रारदारांनाच हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला.

बाजारातील शूटिंगसाठी कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नसतानाही प्रभाग अधिकारी त्यांनी परवानगी घेतली आहे असे स्पष्टपणे खोट बोलत आहेत. तरी संबंधित प्रभाग अधिकार्‍यावर जबाबदारी निश्चित करून आयुक्तांनी कारवाई केली पाहिजे.
– कृष्णा गुप्ता, माहिती अधिकार कार्यकर्ता

रामदेव पार्क मार्केटमध्ये कोणतीही परवानगी न घेता शूटिंग करणार्‍यावर आयुक्तांच्या आदेशाने कारवाई करून शुल्क वसूल करुन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करणार आहोत.
– नरेंद्र चव्हाण, प्रभाग अधिकारी

पूर्वी गार्डनची जागा शूटिंगसाठी देत होते. आता भाजीमार्केटही देत आहेत. यावर तातडीने कारवाई करावी व ठेकेदाराकडून ठेका काढून घ्यावा. -जिवीका जैन, रहिवासी

First Published on: February 15, 2020 2:39 AM
Exit mobile version