श्रीपाद जोशींचा राजीनामा

श्रीपाद जोशींचा राजीनामा

Shripad_Joshi

प्रसिद्ध लेखिका नयनतारा सहगल यांचे मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटकपदाचे निमंत्रण ऐनवेळी रद्द केल्याच्या वादाचा केंद्रबिंदू हा साहित्य मंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी हेच असल्याने त्यांच्यावर गेल्या दोन दिवसांपासून टीकेची झोड उठवण्यात आली होती. या टीकेची जबाबदारी घेत जोशी यांनी साहित्य मंडळाच्या अध्यक्षपदाचा बुधवारी राजीनामा दिला. सहगल यांचे निमंत्रण रद्द करण्याआधी श्रीपाद जोशी यांनी साहित्यिकांशी चर्चा करायला हवी होती, अशा शब्दात काही साहित्यिकांनी नाराजी व्यक्त केली होती. जोशींच्या या निर्णयामुळे महामंडळाचे इतर सदस्य निष्कारण टीकेचे धनी ठरत आहेत, असेही काही साहित्यिकांनी म्हटले होते. या पार्श्वभूमीवर बुधवारी जोशी यांनी पदाचा राजीनामा दिला. विदर्भ साहित्य संघाच्या ई-मेलवर त्यांनी राजीनामा दिला. महामंडळाच्या उपाध्यक्ष असलेल्या विद्या देवधर यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे येण्याची शक्यता आहे.

यवतमाळमध्ये होणार्‍या संमेलनाची आयोजक संस्था आणि मराठी साहित्य महामंडळ यांच्यातील तीव्र मतभेदांची परिणती संमेलनाच्या नियोजित उद्घाटक साहित्य अकादमी पुरस्कारविजेत्या लेखिका नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द करण्यात झाली. मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला इंग्रजीत लिहिणार्‍या लेखिकेला का बोलावले, असा आक्षेप नोंदवत काही स्थानिक संघटनांनी संमेलन उधळण्याचा इशारा दिला. त्यानंतर हे निमंत्रण रद्द करीत असल्याचे संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉ. रमाकांत कोलते यांनी सांगितले होते. डॉ. वि. भि. कोलते संशोधन केंद्र व वाचनालय या संस्थेकडे संमेलनाचे यजमानपद आहे. सहगल यांचे निमंत्रण रद्द केल्यानंतर महामंडळ आणि आयोजक संस्था या नामुष्कीचे खापर परस्परांच्या डोक्यावर फोडत आहेत.

First Published on: January 10, 2019 5:15 AM
Exit mobile version