कल्याण-डोंबिवलीकरांनो सावधान!

कल्याण-डोंबिवलीकरांनो सावधान!

Unauthorized Parking

रस्त्याच्या कडेला वाहने लावून जात असाल आणि आठ-पंधरा दिवस त्या वाहनांकडे फिरकतही नसाल तर सावधान…बेवारस व धूळ खात पडलेल्या वाहनांवर आता वाहतूक पोलीस आणि पालिका प्रशासनाकडून कारवाई केली जाणार आहे. मात्र त्यानंतर वाहन सोडविण्यासाठी सहा हजार ते अडीच हजार रूपये दंड भरावा लागणार आहे. बुधवारपासूनच बेवारस वाहनांवर कारवाईस प्रारंभ झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानंतर पालिका प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उगारला आहे. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कल्याण डोंबिवलीचा दौरा केला होता. त्या दौर्‍यात रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात बेवारस वाहने धूळ खात पडून असल्याचे त्यांच्या दृष्टीस पडले होते.

बेवारस वाहनांमुळे शहराच्या अस्वच्छतेत भर पडते. त्यामुळे ही वाहने तातडीने उचलण्याचे तसेच शहर स्वच्छतेवर भर देण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. यानंतर पालिका प्रशासनाने हे आदेश गंभीरपणे घेतले आहेत. सुरुवातीला पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी रेल्वे स्थानक आणि स्कायवॉक परिसरात ठाण मांडून बसणार्‍याा फेरीवाल्यांमुळे बकालपणाचे दर्शन घडत असल्याने धडक कारवाई केली. पालिका आयुक्तांनी स्वत: पाहणी केल्यानंतर कारवाई सुरूवात केली होती.

पालिका आयुक्तांच्या पाहणी दौर्‍यामुळे स्कायवॉक आणि स्टेशन परिसराने फेरीवाल्यांच्या विळख्यातून मोकळा श्वास घेतला आहे. आता पालिका आयुक्तांनी आपला मोर्चा रस्त्याच्या कडेला अनेक वर्षे बेवारसपणे उभ्या असलेल्या व धूळखात पडलेल्या वाहनांकडे वळविला आहे. बुधवारी सकाळपासून पालिका प्रशासनाने वाहतूक पोलिसांच्या मदतीने बेवारस गाड्या उचलण्याची कारवाई केली. चारचाकी वाहनांसाठी सहा हजार रूपये तर दुचाकी वाहनांसाठी अडीच हजार रूपये दंड आकारला जाणार आहे. या कारवाईसाठी मनुष्यबळ आणि वाहनांची व्यवस्था पालिका प्रशासनाकडून केली जाणार आहे.

First Published on: February 27, 2020 5:40 AM
Exit mobile version