स्मार्ट इंडिया हॅकेथॉनमध्ये विद्यार्थ्यांनी शोधला समस्यांवर तोडगा

स्मार्ट इंडिया हॅकेथॉनमध्ये विद्यार्थ्यांनी शोधला समस्यांवर तोडगा

Smart India Hackathon

सर्वसामान्यांना दैनंदिन आयुष्यात येणार्‍या समस्यांवर तंत्रज्ञानाच्या मदतीने तोडगा काढता यावा या उद्देशाने माटुंगामधील वेलिंगकर इन्स्टिट्यूटमध्ये नुकतेच दोन दिवसीय ‘स्मार्ट इंडिया हॅकेथॉन’ झाले. यामध्ये देशातील 28 इंजिनियरिंग कॉलेजमधील विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये कम्युनिकेशन, हेल्थकेअर, बायोमेडिकल, शेती, ग्रामीण विकास आणि वेस्ट मॅनेजमेंट या समस्यांवर विद्यार्थ्यांनी सलग 36 तास मेहनत करून तंत्रज्ञानाच्या आधारे तोडगा शोधण्याचा प्रयत्न केला. यामध्ये पंजाबमधील विद्यार्थ्यांनी अव्वल क्रमांक पटकावला तर पुण्यातील कमिन्स कॉलेजच्या विद्यार्थिनींनी दुसरा क्रमांक पटकावला आहे. त्याचबरोबर दिल्ली, तामिळनाडू आणि महाराष्ट्रातील अन्य कॉलेजच्या विद्यार्थ्यांनीही उल्लेखनीय कामगिरी केली.

‘स्मार्ट इंडिया हॅकेथॉन’मध्ये महाराष्ट्र, पंजाब, मध्य प्रदेश, तामिळनाडू, दिल्ली, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा आदी राज्यातील 28 इंजिनियरिंग कॉलेजमधील 180 विद्यार्थी व त्यांचे मार्गदर्शक सहभागी झाले होते. महाराष्ट्राच्या मानव संसाधन विभाग व एआयसीटीई यांच्या मार्गदर्शनाखाली हॅकेथॉन भरवण्यात आले होते. यामध्ये सहभागी विद्यार्थ्यांना 36 तासांमध्ये सर्वसामान्यांच्या समस्यांवर तोडगा शोधण्यास सांगण्यात येतो. ऑनलाईन शॉपिंगमध्ये एखादे शर्ट, ड्रेस, लिपस्टिक विकत घेताना ती आपल्याला शोभून दिसेल का? घरासाठी खरेदी केलेले पडदे, चादरी व अन्य वस्तू कशा दिसतील असा प्रश्न अनेकांना पडतो. या वस्तू खरेदीपूर्वीच आपल्याला शोभून दिसतात का हे पाहणारे अ‍ॅप पंजाब व पुण्याच्या कमिन्स कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी बनवले. मात्र हे संशोधन 36 तासांत पूर्ण करणे आवश्यक होते. पंजाबच्या विद्यार्थ्यांनी पुण्याच्या कमिन्सच्या विद्यार्थिनींपेक्षा अधिक काम पूर्ण केल्याने त्यांना दुसर्‍या क्रमाकांवर समाधान मानावे लागते तर पंजाबच्या कॉलेजने प्रथम क्रमांक पटकावला. पंजाबच्या विद्यार्थ्यांना एक लाख रोख व ट्रॉफीने गौरवण्यात आले.

मॉलमध्ये वस्तू शोधणे होणार सोपे
शॉपिंग मॉल, फूड प्लाझा किंवा बिग बाजारमध्ये खरेदीसाठी जाणार्‍या व्यक्तींना अनेकदा कोणती वस्तू कोठे आहे हे माहीत नसते. त्यामुळे त्यांना संपूर्ण मॉल फिरावे लागते. त्यामुळे नागरिकांची चिडचिड होते व अनेकदा मनाजोगी वस्तू खरेदी करता येत नाही. हॅकेथॉनमध्ये सहभागी झालेल्या वेलिंगकर इन्स्टिट्यूटच्या टीमने नागरिकांचा त्रास कमी करण्यासंदर्भात तोडगा शोधला आहे. त्यांनी मॉलमधील प्रत्येक रॅकच्या सुरुवातीला एक स्क्रीन बसवण्याची कल्पना शोधली आहे. रॅकच्या रांगेमध्ये जाण्यापूर्वी त्या स्क्रीनवर आपल्याला आवश्यक वस्तू आहे का हे नागरिकांना पाहता येणार आहे. रॅकमधील प्रत्येक वस्तूची किंमत, कोणत्या कंपनीची तसेच ती नेमकी कोठे आहे अशी इत्यंभूत माहिती स्क्रीनवर उपलब्ध असणार आहे. यामुळे शॉपिंग मॉलमध्ये नागरिकांना खरेदी करताना होणारा त्रास कमी होण्यास मदत होणार आहे.

संशोधनाचा कालावधी होणार कमी
संशोधनाच्या चाचण्या चार भागात करण्यात येते. तपासणीला बराच कालावधी लागत असल्याने एखादे उत्पादन नागरिकांसमोर येण्यासाठी 10 ते 15 वर्षांचा कालावधी लागतो. त्यामुळे संशोधनाच्या तपासणीतील कालावधी कमी करण्यावर अमरावतीच्या सिपना कॉलेज ऑफ इंजिनियरींग अँड टेक्नोलॉजीच्या विद्यार्थ्यांनी संशोधन केले. यामध्ये त्यांनी काही टप्प्यांमधील संशोधनाचे गृहितक पूर्वीच्या टप्प्यातील संशोधनावर मांडता येऊ शकते यावर संशोधन केले.

मशीनच्या डागडुजीची माहिती देणारे संशोधन
पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी कंपनीमध्ये वापरण्यात येणारे मशीन किती दिवसाने बंद पडेल, किती दिवस ते व्यवस्थित चालू शकेल, त्याला कधी सर्व्हिसिंग करण्याची आवश्यकता आहे, मशीनची क्षमता किती आहे. त्याची दुरुस्ती करणे योग्य आहे की नवीन मशीन घ्यावी याबाबत त्यांनी संशोधन करून विशेष पद्धत शोधून काढली. यामुळे कंपनीतील कामगारांचे होणारा त्रास कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच कंपनीला वेळेपूर्वी मशीनबाबत माहिती मिळणार असल्याने कंपनीचे नुकसानही टाळण्यास मदत होणार आहे.

आपल्या देशात सरकारी व खासगी क्षेत्रात अनेक समस्या आहेत. या सोडवण्याच्या अनुषंगाने हॅकेथॉन राबवण्यात येते. समस्यांवर डिजिटलच्या माध्यमातून विविध समस्यांवर तोडगा काढण्यासाठी विद्यार्थी प्रयत्न करत आहेत. यातून मुलांना आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळून त्यांच्या सृजनशीलतेला वाव मिळण्यास मदत होते. तसेच विद्यार्थ्यांमध्ये एकत्रित काम करण्याचे कौशल्य प्राप्त करता येईल.
– प्रो. डॉ. उदय साळुंखे, संचालक, वेलिंगकर इन्स्टिट्यूट

First Published on: March 6, 2019 5:15 AM
Exit mobile version