Coronavirus Crisis: मुंबईतील अनेक पत्रकार कोरोना पॉझिटिव्ह

Coronavirus Crisis: मुंबईतील अनेक पत्रकार कोरोना पॉझिटिव्ह

मुबंई आणि महाराष्ट्रातील कोरोनाशी संबंधित बातम्या देणाऱ्या पत्रकारांनाही कोरोनाची लागण झाली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेच्यावतीने मुंबईतील पत्रकार, फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर यांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. माध्यमातील १६७ लोकांनी यावेळी चाचणीत सहभाग घेतला होता. त्यातील काही लोकांच्या चाचण्या समोर आल्या असून १० टक्के पत्रकार पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर आणखी काही पत्रकारांचे चाचणी अहवाल येणे बाकी आहे. याबद्दल अधिकृत माहिती अद्याप मुंबई महानगरपालिका आणि सार्वजनिक आरोग्य खात्याकडून मिळालेली नाही.

भारतात २५ मार्च पासून लॉकडाऊन घोषित करण्यात आला असला तरी माध्यमे अत्यावश्यक सेवेत मोडत असल्यामुळे माध्यमांचे प्रतिनिधी फिल्डवर काम करत आहेत. फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर आणि वृत्तवाहिन्यांचे पत्रकार अनेक ठिकाणी वार्तांकन करण्यासाठी जातात. यावेळी अनेक ठिकाणी त्यांचा कोरोनाबाधित व्यक्तिंशी संपर्क झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.

काही दिवसांपूर्वी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील पत्रकारांची कोरोना चाचणी घेतली होती. त्या चाचणीतही काही पत्रकारांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचे लक्षात आले होते. त्यानंतर या पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार देखील सुरु करण्यात आले होते. ठाण्यातील प्रसंगानंतर आता मुंबईमध्येही पत्रकारांची चाचणी घेण्यात आली. त्यात मोठ्या संख्येंने कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याचे सूत्रांच्या माहितीनुसार सांगण्यात येत आहे.

 

First Published on: April 20, 2020 1:15 PM
Exit mobile version