मॅजिक मिक्सने सोडिवले तंबाखूचे व्यसन

मॅजिक मिक्सने सोडिवले तंबाखूचे व्यसन

Best magic mix

खिशात तंबाखु पुडी, चुन्याची डबी आहे का ? अस विचारायलाच आता बेस्ट उपक्रमातील ड्रायव्हर आणि कंडक्टर विसरले आहेत. चुना – तंबाखुच्या मळीची जागा आता घेतली आहे ती म्हणजे मॅजिक मिक्सच्या चुर्णाने. बेस्ट उपक्रमातील जवळपास २ हजार जणांची तंबाखुचे व्यसन तोडले आहे. आता बेस्ट उपक्रमाकडून लवकरच मॅजिक मिक्सचे पेटंट दाखल करण्यात येणार आहे. बेस्टमधील ड्रायव्हर – कंडक्टरला लागु झालेले चुर्णासाठी आता देशातील अनेक राज्यांमध्ये मागणी सुरू झाली आहे.

मॅजिक मिक्स चुरण हे तंबाखूमध्ये गरजेच्या असणारी निकोटीनची तलप कमी करण्यासाठी मुख्यत्वेकरून मदत करते. या चुरणातील दालचिनीमुळे निकोटीनचे प्रमाण भरून काढण्यासाठी मदत होते. त्यामुळे चुर्ण हे संपुर्णपणे वैज्ञानिक तत्वावर आधारीतच अशा पद्धतीने तयार करण्यात आले आहे. तंबाखूतील निकोटीनने सतत ती खाण्यासाठीची सवय होते असे ९७ टक्के तंबाखू सेवन करणार्‍यांमध्ये आढळले आहे. त्यामुळेच तंबाखू सोडण्यासाठी अतिशय कठीण होते. पण मॅजिक मिक्सने हे व्यसन सोडण्यासाठी सकारात्मक बदल घडवला आहे. तंबाखूच्या मळीची जागा ही मॅजिक मिक्सने तर चुन्याची जागा ही तांदळाच्या पिठाने घेतली आहे. सरासरी एक ते दोन महिन्यात मॅजिक मिक्सचे सेवन करून तंबाखूचे व्यसन सुटण्यासाठी अनेकांना फायदा झाला आहे अशी माहिती बेस्टचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ अनिलकुमार सिंघल यांनी दिली. उपक्रमातील अनेक ड्रायव्हर आणि कंडक्टरमध्ये वाढणारे तंबाखूचे व्यसन पाहता त्यांनी गेल्या दीड वर्षे मॅजिक मिक्सचा फॉर्म्युला उपक्रमात राबवला आहे.

मॅजिक मिक्सचा वापर हा तब्बल २ हजार जणांनी केला. तंबाखुचे व्यसन असणार्‍या अनेकांचे समुपदेशन करून आतापर्यंत ५ हजार लोकांनी तंबाखू सोडली असल्याचे त्यांनी सांगितले. मॅजिक मिक्ससाठी कॉपीराईट दाखल केला असून लवकरच याबाबतचे पेटंट दाखल करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आतापर्यंत जामनगर कॅन्सर रिसर्च इंस्टिट्युटने ५ हजार जणांसाठी हे मॅजिक मिक्स देताना एक नवा विक्रम नुकताच केला. तर चेन्नई, हिमाचल प्रदेशातूनही या मॅजिक मिक्ससाठी मागणी करण्यात आली आहे.

काय आहे मॅजिक मिक्समध्ये
मॅजिक मिक्समध्ये २५ ग्रॅम दालचिनी, २५ ग्रॅम जिरे, २५ ग्रॅम ओवा, २५ ग्रॅम बडिशेप, ४ ते ५ लवंग याच मिश्रण करून पुड तयार होते. या पदार्थांच्या मिश्रणातून तयार झालेले चुर्ण हे दिसायला तंबाखूसारखे दिसते. तसेच हे चुर्ण खाल्यानंतर तंबाखू खाल्ल्याचे समाधान वापरकर्त्याला मिळते. मॅजिक मिक्सची पुडी किंवा डबी तंबाखूला पर्याय म्हणून वापरताना चुना म्हणून तांदळाचे पिठ देण्यात आले आहे. दिवसातून मॅजिक मिक्स २० ग्रॅमपेक्षा जास्त खायची नाही. तसेच मॅजिक मिक्स चुर्ण थुंकण्याची गरज नाही, उलट हे गिळल्यास शरीरासाठी फायदाच आहे.

काय आहेत फायदे
तंबाखूची तलफ कमी करण्यासाठी हे चुर्ण रामबाण उपाय आहे. अँटी कॅन्सर, अँटी ऑक्सिडंट आणि दाहशामक गुणधर्म असलेले जिरे हे तंबाखूच्या सतत सेवनामुळे तयार झालेले तोंडातील चट्टे कमी करण्यासाठी मदत करते. ओव्यामुळेही तंबाखूशी निगडीत असलेला ह्दयरोग, पक्षाघात आणि अकाली वार्धक्य यांना आळा घालण्याचे काम करते. बडीशेप ही पित्तशामक पाचक आहे. तर लवंग मौखिक आरोग्य सुधारते तसेच दाहशामकही आहे. मधुमेह, रक्तदाब आणि रक्तातील चरबी व स्थुलता मात करण्यासाठी मॅजिक मिक्स गुणकारी आहे.

First Published on: August 8, 2019 5:04 AM
Exit mobile version