सपा-बसपा सर्व ४८ जागी लढणार – अबु आझमी

सपा-बसपा सर्व ४८ जागी लढणार – अबु आझमी

समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी

काँग्रेस सेक्युलर पक्षांना एकत्र घेण्याच्या मानसिकतेमध्ये नाही. काँग्रेस आणि भाजप एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. महाराष्ट्रात सपाने एकच जागा मागितली होती. मात्र काँग्रेसने ती जागा देखील देण्यास नकार दिला. राष्ट्रीय पातळीवर सपा आणि बसपा एकत्र आलेले आहे. त्यामुळे ही आघाडी आम्ही महाराष्ट्रातही कायम ठेवण्याचा विचार केला आहे. महाराष्ट्रातील ४८ पैकी ४८ जागा सपा-बसपाने लढण्याचा निर्णय घेतला असल्याचे, समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पक्षाने उत्तर प्रदेश राज्यात आघाडी केली आहे. काँग्रेसला काही जागा सोडून त्यांना आघाडीबाहेर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात देखील काँग्रेसने सपा मागणी करत असलेली जागा त्यांना दिली नाही. त्यामुळेच महाराष्ट्रात देखील सपा आणि बसपाने एकत्र येण्याचा निर्णय आज जाहीर केला.

काय म्हाणाले आझमी

यावेळी अबू आझमी म्हणाले की,”उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूर मतदारसंघातील पोटनिवडणुकीत सपा-बसपाने एकत्र येत विजय मिळवला. आमच्यादृष्टीने ती सेमी फायनल मॅच होती आता फायनल मॅच जिंकण्यासाठी आम्ही तयारी केली आहे. काँग्रेस सोबत महाराष्ट्रात आघाडी करण्यासाठी आमचा विचार सुरु होता, मात्र काँग्रेसने दाद दिली नाही.”

समीकरणे बघून उमेदवार घोषित केले जातील

बसपाचे खासदार अशोक सिद्धार्थ म्हणाले की,”बसपा सोशल इंजिनिअरिंग करुन यशस्वी झालेला पक्ष आहे. महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघातील जातीचे समीकरणे बघून उमेदवार घोषित केले जातील. बसपाचे प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीसोबत युती करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. वंचितच्या नेत्यांनी आजवर एकदाही आमच्याशी संपर्क साधलेला नाही.”

First Published on: March 19, 2019 2:59 PM
Exit mobile version