रेल्वे कर्मचाऱ्यांच्या जिवाची किंमत नाही का? विशेष लोकलमध्ये कर्मचाऱ्यांचीच गर्दी!

रेल्वे कर्मचाऱ्यांच्या जिवाची किंमत नाही का? विशेष लोकलमध्ये कर्मचाऱ्यांचीच गर्दी!

राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाच आता लांब पल्ल्याच्या रेल्वे सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे मुंबईतल्या स्थानकांमध्ये, वर्कशॉप्समध्ये, कारशेडमध्ये कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्यासाठी सांगण्यात आलं आहे. बुधवारपासून या कर्मचाऱ्यांना नेण्यासाठी विशेष लोकल देखील चालवण्यात येत आहेत. मात्र, या लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सोशल डिस्टन्सिंगची कोणतीही काळजी घेतली जात नसल्याचं दिसून आलं आहे. त्यासंदर्भातला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला असून यामध्ये लोकलमध्ये हे रेल्वे कर्मचारी सीटवर देखील आजूबाजूला बसले असून मधल्या जागेत नेहमीप्रमाणे उभे राहून देखील प्रवास करत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे इतरांसाठी सोशल डिस्टन्सिंगचा आग्रह केला जात असताना रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी सोशल डिस्टन्सिंगची अट नाही का? असा देखील मुद्दा उपस्थित केला जाऊ लागला आहे.

लोकलच्या १४ विशेष फेऱ्या!

येत्या १ जूनपासून देशभरात अडकलेल्या नागरिकांसाठी रेल्वे मंत्रालयाने नियोजित वेळापत्रकानुसार दररोज १०० ट्रेनच्या २०० फेऱ्या सुरु करण्याची घोषणा केली. त्यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या वर्कशॉपमधील कर्मचारी, देखभाल दुरूस्तीचे कर्मचारी, रेल्वे स्टेशनवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावर बोलवण्यात आले आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांना कामावर येण्यासाठी मध्य रेल्वेकडून कर्जत ते सीएसएमटी, कसारा ते सीएसएमटी आणि पनवेल ते सीएसएमटी अशा एकूण १४ लोकल फेऱ्या चालवण्यात येत आहेत. मात्र कर्मचारी संख्या जास्त असल्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांना लोकलमध्ये बसायला आसन मिळत नाहीत. त्यामुळे उभे राहून प्रवास करावा लागत असल्याचा प्रकार समोर आला आहे. सोशल डिस्टंन्सिंगचेही पालन होत नसल्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होण्याची भीती निर्माण झाली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ शुक्रवारचा कल्याण रेल्वे स्टेशनवरचा आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांची ड्युटी सकाळी ८ वाजून ३० मिनिटांची असते. रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी सकाळी एकच लोकल असल्याने या लोकलमध्ये गर्दी होत आहे, अशी माहिती प्रवास करणाऱ्या एका रेल्वे कर्मचाऱ्याने ‘आपलं महानगर’ला दिली. तसेच ही लोकल डोंबिवली रेल्वे स्थानकावर भरून जात आहे. त्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले असून रेल्वे कर्मचाऱ्यांनी सकाळी ड्युटी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी लोकल फेऱ्या वाढविण्याची मागणी मध्य रेल्वे प्रशासनाला केली आहे.

तीन दिवसांत पूर्ण कारशेड कार्यरत

मिळालेल्या माहितीनुसार रेल्वेचे लोअर परळ वर्कशॉप, महालक्ष्मी वर्कशॉप, मुंबई सेंट्रल, कारशेड आणि कोच केअर सेंटर आणि बांद्रा टर्मिनल्स कोच केअर सेंटर येत्या दोन ते तीन दिवसांत सुरु करण्यात येणार आहे. या वर्कशॉप आणि कोच केअर सेंटरमध्ये काम करणारे कर्मचारी मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे सुद्धा लोकल फेऱ्या आता वाढवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

वेळोवेळी रेल्वे कर्मचाऱ्यांना सोशल डिस्टन्सिंग पाळण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. त्यामुळे सर्व रेल्वे कर्मचाऱ्यांनी सूचनांचे पालन करून सहकार्य करावे.

ए. के. जैन, वरिष्ठ जनसपंर्क अधिकारी, मध्य रेल्वे

First Published on: May 22, 2020 7:28 PM
Exit mobile version