संगीत कला अकादमीवर लाखोंचा खर्च करुनही सुरेल आवाजाचे गायक घडत नाहीत

संगीत कला अकादमीवर लाखोंचा खर्च करुनही सुरेल आवाजाचे गायक घडत नाहीत

Congress leader sonam jamsutkar

मुंबई महापालिका शाळांची स्वतंत्र कला अकादमी असली तरी या अकादमीतून नव्या दमाचे लिटल चॅम्प तयार होताना दिसत नाही. सुसज्ज अशी कला अकादमी असतानाही महापालिका शाळांमधून सुरेल आवाजाचे गायक घडत नाही ही अत्यंत खेदाची गोष्ट असून अनेक मुलांमध्ये असे सुप्त कलागुण आहेत. त्यांना हेरुन सध्या विविध चित्रवाहिन्यांवर बाल गायकांसाठी जे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे, तिथपर्यंत तरी नेण्याचा काम या कलाअकादमीने करावा,अशी सूचना काँग्रेसच्या नगरसेविका सोनम जामसूतकर यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात केली आहे.

शिक्षण विभागाचा अर्थसंकल्प समिती अध्यक्ष अंजली नाईक यांना सादर केल्यानंतर सोमवारपासून अर्थसंकल्पीय भाषणाला सुरुवात झाली. यावेळी शिक्षण विभागाच्या अर्थसंकल्पावर भाषण करताना काँग्रेस नगरसेविका सोनम जामसुतकर यांनी महापालिका शाळांची सहल बोरीवली तसेच राणीबागेत आयोजित केली जाते. परंतु, याबरोबरच भावी पिढीला संयुक्त महाराष्ट्राचा इतिहासाची माहिती व्हावी यासाठी शिवाजीपार्क येथील संयुक्त महाराष्ट्र कलादालनाच्या ठिकाणी महापालिका शाळांमधील मुलांची एकदिवसीय सहल आयोजित करावी,अशीही सूचना केली.

शाळांमध्ये मुलांना दिली थंडगार खिचडी –

महापालिका शाळांमध्ये थंडगार असलेली खिचडी दिली जाते. विशेष म्हणजे त्याला नाही काही चव की रव. त्यामुळे खुद्द अध्यक्षांनी पोषक आहार दिला जातो त्यावेळेस अचानकपणे शाळेला भेट द्यावी आणि खिचडीचा पदार्थ कोणत्या दर्जाचा दिला जातो हे पहावे,असे आवाहनच त्यांनी केले. मुलांना सकस आहार पुरवताना त्यामध्ये कोणतीही हयगय करू नये. कोणत्याही संस्थेचे लाड पुरवू नये. त्यामुळेच ज्या शाळांमध्ये चांगल्याप्रकारची खिचडी पुरवली जात नाही, अशी तक्रार मुलांनी करताच त्या संस्थेवर कारवाई केली जावी. खिचडी पुरवणार्‍या संस्थांवर कारवाई करताना, शालेय मुलांचे मत तथा त्यांचे जबाब नोंदवूनच कारवाई व्हायला हवी,असेही त्यांनी सांगितले.

शालेय इमारतींच्या दुरुस्ती आणि पुनर्रचनेच्या बांधकामांसाठी एकूण ३४६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ही तरतूद भरीव असली तरी एका बाजुला पटसंख्या कमी होऊन शाळा बंद होत चालल्या आहेत. त्यामुळे, ज्या विभागांमध्ये शालेय मुलांची पटसंख्या वाढत आहे त्या भागातील शाळांची डागडुजी तसेच बांधकाम प्राधान्याने घेण्यात यावे. शाळा दुरुस्ती आणि पुनर्रचनेच्या कामांमध्ये प्राधान्यक्रम ठरवण्यात यावा. पैसा आहे म्हणून खर्च करण्याऐवजी आर्थिक काटकसर करताना खरोखरच जिथे आवश्यकता आहे तेथील बांधकाम करावे आणि त्यानंतर उर्वरीत भागांमधील शाळांची कामे हाती घ्यावीत, अशीही सूचना जामसूतकर यांनी केली.

शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा –

माटुंगा रोड येथील वुलन मिलमध्ये आयसीएसई आणि अंधेरी पूनम नगर येथील शाळेत सीबीएसई बोर्डाची शाळा आपण प्रायोगिक तत्वावर सुरु करणार आहोत. या शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा असेल यात कोणतीही शंका नाही. पण जेव्हा आपण पुढे जातो, तेव्हा मातृभाषेबरोबरच ज्ञानाची भाषा म्हणून इंग्रजी भाषेलाही महत्त्व द्यायला हवा. याचा अर्थ मराठी मारुन इंग्रजीला तारायचे असे नाही. मातृभाषेतील शाळा टिकल्याच पाहिजे आणि त्या टिकवण्याच्या दृष्टीकोनातूनही मराठी भाषांसह इतर भाषिक शाळांमध्ये मातृभाषेचे महत्त्व अबाधित राखून इंग्रजी विषयाचे शिक्षणही तेवढेच प्रभावीपणे द्यायला हवे, असे त्यांनी म्हटले आहे.

First Published on: February 10, 2020 9:59 PM
Exit mobile version