नालासोपार्‍यातील श्रीप्रस्थचे झाले डंपिंग ग्राऊंड

नालासोपार्‍यातील श्रीप्रस्थचे झाले डंपिंग ग्राऊंड

(नालासोपारा पश्चिमेकडील श्रीप्रस्थ परिसराला डंम्पिंग ग्राऊंडचे स्वरुप आले आहे. )

नालासोपारा पश्चिमेतील परिसरातील श्रीप्रस्थ येथील चौथा रस्त्या परिसरात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य तयार झाले आहे. या साचलेल्या घाणीमुळे ये-जा करणार्‍या नागरिकांना याचा मनस्ताप सहन करावा लागत असून आरोग्याचा धोका निर्माण झाल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.

नालासोपारा पश्चिमेला श्रीप्रस्थ परिसर आहे. याभागात नव्याने मोठी नागरी वसाहत तयार झाली आहे. या नागरी वस्ती मधून गेलेल्या चौथ्या रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात येतो. त्यामुळे यापरिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. हे कमी म्हणून की काय मोकळ्या जागेत सांडपाणी साचून राहत असते. त्यामुळे यापरिसराला डंम्पिंग ग्राऊंडचे स्वरुप आले आहे. घाण आणि सांडपाण्यामुळे यापरिसरात कायम दुर्गंधी पसरलेली असते.

परिणामी डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यातूनच येथील हजारो लोकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. धक्कादायक बाब म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणावर कचरा साचलेला असताना महापालिकेचे आरोग्य खाते मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. नियमितपणे कचरा उचलला जात नसल्यानेच कचर्‍याचे ढिग साचून राहिल्याचा येथील नागरीकांचा आरोप आहे.

दुसरीकडे गॅरेज सुरू केल्याने येथील लोकांची डोकेदुखी वाढवली आहे. जुनाट, गंजलेली वाहने रस्त्याकडेला टाकून देण्यात आलेली आहेत. त्यातून लोकांच्या रहदारीचा रस्ता बेवारस वाहनांनी व्यापून टाकला आहे. मालकांची गंजून गेलेली वाहने सुद्धा रस्त्यावर टाकून देण्यात आली आहे.

यावसाहतीमध्ये शंभरहून अधिक बहुमजली इमारती आहेत. वसाहती अंतर्गत रस्तेही बनवण्यात आलेले नाहीत. त्यामुळे खड्यातून लोकांना ये-जा करावी लागते. पावसाळ्यात तर वाहन चालवणेही अवघड होऊन बसते. त्यामुळे येथील नागरीक नागरी समस्यांमुळे हैराण झाले आहेत. येथील कचरा दररोज उचलून स्वच्छता करण्यात यावी. बेकायदेशीरपणे सुुरु असलेली गॅॅरेज बंद करण्यात यावीत. रस्त्यांची डागडुजी करण्यात यावी, अशा येथील लोकांच्या मागण्या आहेत.

First Published on: September 30, 2019 5:01 AM
Exit mobile version