एसटी ४०८ कि.मी. धावली, उत्पन्न मिळाले ६९ रुपये

एसटी ४०८ कि.मी. धावली, उत्पन्न मिळाले ६९ रुपये

एसटी महामंडळाला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी सरकारकडून विविध प्रयत्न केले जात आहेत. प्रत्यक्षात मात्र नेमके विरोधाभास चित्र समोर येत आहे. एसटी महामंडळाच्या परभणी जिल्ह्यातील जिंतूर आगारामधील एका बसगाडीने जिंतूर ते पुणे असा ४०८ किलोमीटरचा प्रवास केला. या फेरीतून महामंडळाला अवघे ६९ रुपये इतकेच उत्पन्न मिळाले. या धक्कादायक प्रकारानंतर आगार प्रमुखाने तात्काळ संबंधित एसटीचे चालक आणि वाहक यांना तात्पुरते निलंबित करून त्यांची चौकशी सुरू केली आहे उपरोक्त धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यामुळे ही एसटी बसगाडी ठरलेल्या सर्व स्थानकांवर उभी करण्यात आली होती का की स्थानके वगळून गाडी पुढे दामटवण्यात आली?, प्रवाशांना एसटी बसगाडीत घेतले होते का? कि रिकामीच एसटी पळवण्यात आली? प्रवाशांकडून पैसे घेतले परंतु त्यांना तिकिटे दिलीच नाहीत, असा प्रकार घडला का? असे अनेक प्रश्न आता या प्रकारामुळे निर्माण झाले आहेत. चौकशीअंती या सर्वांचा उलगडा होणार आहे. मात्र या एका उदाहरणावरून महामंडळाचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. अशा प्रकारे जर एसटी कर्मचारी कामचुकारपणा करत असतील, तर एसटी महामंडळ आधीच कोट्यवधी रुपयांच्या तोट्यात आहे, ती आणखी खाईत लोटली जाण्याची भीती महामंडळाला वाटत आहे.

जिंतूर आगारातून दररोज जिंतूर ते पुणे या मार्गासाठी रात्री ७ वाजता एसटी बस सोडण्यात येते. मात्र बुधवारी, ७ नोव्हेंबर रोजी बस क्रमांक ३०७२ ही बस सव्वातास उशिरा अर्थात रात्री ८.१५ वाजता सोडण्यात आली. त्या बसगाडीवर चालक श्रीरंग घुले (बिल्ला क्र. १८६७८), तर वाहक एस.बी. थोरात (बिल्ला क्र. २२८०२) हे कर्तव्य बजावत होते. त्यावेळी एका प्रवाशाने जिंतूर येथून ६९ रूपयांचे तिकीट काढले. त्यानंतर पुण्यापर्यंत एकही तिकीट काढले नसल्याचे दिसून आले. या बसगाडीने जिंतूर ते पुणे असा ४०८ किलोमीटर प्रवास पूर्ण केला. याबाबत विचारणा केली असता चालक-वाहक यांनी प्रवासादरम्यान एकही प्रवाशी बसगाडीत चढला नसल्याचे म्हटले. मात्र महामंडळ या प्रकरणाची सविस्तर चौकशी करणार आहे.

जिंतूर आगारातून दररोजचे १५ हजार रुपयांपर्यंत उत्पन्न येते, मात्र घुले आणि थोरात यांनी केवळ ६९ रुपयांचे उप्तन्न कसे आणले, यावर आगार प्रमुख सुरेश टकले यांना शंका आली. प्राथमिक चौकशीनंतर त्यांनी वाहक आणि चालक यांना तात्पूरते निलंबित केले. यासंबंधी आम्ही जिंतूर आगार प्रमुखाशी संपर्क केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मात्र जिंतूर आगारातील एसटी चालक आणि वाहक यांच्या प्रतापामुळे महामंडळाच्या पायाखालची जमीन घसरली आहे. .

गाव तेथे एसटी असे बिरुदावली महामंडळ लावते, त्यानुसार महामंडळाची बसगाडी गावागावात फिरते. त्यासाठी महामंडळ विविध सवलती देते. त्यामुळे महामंडळाला आर्थिक तोटाही सहन करावा लागतो. महामंडळाला आर्थिक तोट्यातून बाहेर काढण्यासाठी महामंडळ विविध प्रयत्न करते. परंतु महामंडळाचे कर्मचारी महामंडळाच्या प्रयत्नांना खो घालत असल्याचे जिंतूर प्रकरणातून दिसून आले आहे. एका बाजुला परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी महामंडळाच्या कर्मचार्‍यांना घसघशीत वेतनवाढ दिली, मात्र कर्मचारी कामचुकारपणा करत असतील, तर महामंडळाला लवकरच गाशा गुंडाळावा लागले, हे निश्चित, अशी प्रतिक्रिया आता सर्वसामान्य देत आहेत.

First Published on: November 28, 2018 5:37 AM
Exit mobile version